फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:51 IST2024-06-18T15:50:59+5:302024-06-18T15:51:27+5:30
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वक्त केली जात आहे. आज दिल्लीत भाजपाच्या नेत्यांची बैठक होत असून फडणवीस भाजपा पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील दारुण पराभवानंतर त्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांना दिल्लीत बोलवून तुर्तास थांबा, असे सांगण्यात आले होते. आज दिल्लीत भाजपाच्या नेत्यांची बैठक होत असून फडणवीस भाजपा पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी उत्सुक आहेत. यामुळे महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे सुरु झाले आहेत. अशातच फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वक्त केली जात आहे. यावरून फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या मंत्र्याने केल्याने नेमके काय घडणार याचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ नाराज नाहीत मी यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे. आरएसएसची जी बैठक होती ती नगरच्या लोकसभा मतदारसंघापुरती होती. तिथे जर तसे झाले असेल तर बारामतीमध्ये काय झाले? तिथेही भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते मंडळी होतेच. अशा फेकाफेकीमुळे विनाकारण महायुतीमध्ये बेबनाव होईल. लोकसभा निवडणुकीत सर्वांचेच अपयश आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही जागा कमी आल्या, तिथेही अजित पवार गेलेले का असे भुजबळ म्हणाले होते, असे मुश्रीफ म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील असे मला वाटत नाही. फडणवीस हे खंबीर नेतृत्व आहे. त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा आहे. हा मार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याची मागणी करणार आहे. शिंदे जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर होते तेव्हा त्यांना आमदारांनी निवेदन दिले होते. शक्तीपीठ महामार्गाला विरोध शेतकऱ्यांनी मतपेटीतून दाखविला आहे. या रस्त्याची काहीही आवश्यकता नाही, अशी भावना आम्हीही मांडली आहे, असे मुश्रीफ म्हणाले.