मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:42 PM2024-05-29T17:42:51+5:302024-05-29T17:42:58+5:30
विविध राजकीय पक्षाचे नेते आक्रमक झाले असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
Prakash Ambedkar ( Marathi News ) : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही भागाचा समावेश करण्यात येणार असल्याच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत आज महाड येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले. मात्र या आंदोलनादरम्यान मनुस्मृतीचा निषेध करत मनुस्मृती फाडत असताना आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडला गेला. यावरून आता विविध राजकीय पक्षाचे नेते आक्रमक झाले असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
"आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात. मनुस्मृती मनातून जाळणं गरजेचं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा जाहीर निषेध आम्ही करतो," अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
महाड येथील आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या आंदोलनावरून इतर राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले.
आव्हाडांनी काय खुलासा केला?
आंदोलनानंतर झालेल्या वादावर खुलासा करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ं"भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करत असताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षात राहिलं नाही. विरोधक त्यावर राजकारण करणार, मी मनुस्मृती जाळू नये म्हणूनही राजकारण केले. माझ्या हातून चूक झाली. मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो. मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो आहे म्हणून फाडलं असं नाही," असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलं आहे.