'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:37 PM2024-12-02T15:37:27+5:302024-12-02T15:39:16+5:30
महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे. पण, या कार्यक्रमात किती नेते शपथ घेणार याबद्दल कोणतीही स्पष्टता अद्याप आलेली नाही.
Mahayuti Maharashtra Chief Minister: महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असली, तरी सरकार स्थापन करण्यात अनेक अडथळे निर्माण होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीत बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप शपथविधी आणि मंत्रिमंडळाबद्दल कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे एकप्रकारे राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीची मुंबईत बैठक होणार होती, पण ती रद्द झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, " एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना सांगितलं आहे. महायुतीचे सरकार आले आहे. प्रचंड बहुमत मिळाले आहे. मी त्यात अडथळा आहे, असे कोणाला वाटत असेल, तर मी स्पष्ट सांगू इच्छितो की, जो निर्णय वरिष्ठ घेतील, तो आम्हाला मान्य असेल. आमची कोणतीही मागणी नाहीये. इतके स्पष्ट बोलल्यानंतरही त्यांच्यावर आरोप करणे योग्य नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे."
'कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे याचा निर्णय शिंदेंना घ्यावा लागेल'
"आता वरिष्ठ जो कोणता निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. नेत्यांनी निर्णय कधी घ्यायचा, यासाठी आम्ही आग्रह करू शकत नाही. त्यांचा आदेश जो काही असेल, तो आम्ही स्वीकारू. एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख आहेत. कोणते पद घ्यायचे, कोणते घ्यायचे नाही, याचा निर्णय घ्यावाच लागेल. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, याचाही निर्णय घेतील. पक्षाची विचाराधारा काय असेल, याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. त्यांच्याकडे हे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आम्ही त्यांची गटनेता म्हणून निवड केली आहे", अशी माहिती शिरसाट यांनी दिली.
#WATCH | Mumbai | Shiv Sena leader Sanjay Shirsat says, "Eknath Shinde has said this in a press conference that Mahayuti govt will be formed. He also said that I am not a hindrance, we (Shiv Sena) don't have any demand. After saying things with this much clarity, I think putting… pic.twitter.com/VsXVx6QPry
— ANI (@ANI) December 2, 2024
"या सगळ्या गोष्टींची त्यांना चिंताही असते आणि निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना विचारही करावा लागतो. आज महायुतीची बैठक व्हायला हवी. कारण वेळ खूप कमी राहिला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक जरूर होईल, असा माझा अंदाज आहे. बैठकीत खातेवाटपाबद्दल चर्चा होईल, असे संजय शिरसाट म्हणाले.