‘एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?’, नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:01 PM2023-10-25T17:01:09+5:302023-10-25T17:03:08+5:30
Nana Patole Criticize Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हटले आहे पण शिंदे यांच्या शब्दावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळानेच जरांगे पाटील यांना शब्द दिला होता, त्याचे काय झाले ते आज दिसतच आहे
मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तर काल दसरा मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवछत्रपतींची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनाची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार? असा टोल नाना पटोले यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या शपथेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हटले आहे पण शिंदे यांच्या शब्दावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळानेच जरांगे पाटील यांना शब्द दिला होता, त्याचे काय झाले ते आज दिसतच आहे. एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा स्वतःच्या खुर्चीची जास्त चिंता आहे. त्यामुळे ते आरक्षण देण्याबाबत काही करतील असे दिसत नाही. ‘आपलं काय आपण बोलून रिकामं व्हायचं’, असे ते मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेपूर्वी म्हणाले होते एवढचं त्यांच्या हातात आहे. ते काहीही करू शकत नाहीत कारण त्यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती आहे, असा टोला पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
दरम्यान, मंगळवारी रात्री दसरा मेळाव्याला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे, मला त्यांचे दुःख, वेदना कळतात. कोणावरही अन्याय न करता, कुणाचेही न काढून घेता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. शिवरायांची शपथ...मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता.