पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:23 AM2023-06-24T06:23:37+5:302023-06-24T06:28:37+5:30

शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा : पास न झाल्यास पुढच्या वर्गात मिळणार नाही प्रवेश 

It is now compulsory to pass the annual examination for class V, VIII | पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक

पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक

googlenewsNext

मुंबई : राज्यात शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली असून, शालेय शिक्षणात पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे. तसेच, पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध केले. शिक्षण हक्क कायदा २०११ तील तरतुदीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यात आता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

नेमकी सुधारणा काय?
शिक्षण हक्क कायद्याच्या सुधारणेनुसार, विद्यार्थी पाचवीची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला पाचवीच्याच वर्गात प्रवेश दिला जाईल.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. 

विद्यार्थी पास झाला नाही तर काय?
एखादा विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. दरम्यान, वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. 
मात्र, संबंधित विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

Web Title: It is now compulsory to pass the annual examination for class V, VIII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.