मोदींच्या आधी भारतीयांना विदेशात किंमत नव्हती असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीनं करणं निंदनीय - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 08:49 AM2022-08-06T08:49:42+5:302022-08-06T08:50:51+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ उठला होता. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर मुंबईत पैसा राहणार नाही, असे राज्यपाल म्हणाले होते. राज्यपालांच्या या विधानावर चौफेर टीकाही झाली होती. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा राज्यपाल आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला. नरेंद्र मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती, असं ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.
“राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं. पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत राज्यपालांवर टीकेचा बाण सोडला.
आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022
तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे.— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022
काय म्हणाले होते राज्यपाल?
"देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ मी पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावं ठेवायची," असं राज्यपाल एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.