'MRI करताना रुग्णालयाला अंधारात ठेवून फोटो काढणं चुकीचं', नवनीत राणांच्या फोटोवरुन आता राजेश टोपेंनीही सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:47 PM2022-05-10T15:47:43+5:302022-05-10T15:48:15+5:30
खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात एमआरआय काढताना घेतलेल्या फोटोवरुन बराच गदारोळ सुरू आहे. शिवसेनेच्यावतीनं लीलावती रुग्णालय प्रशासनाला यावरुन जाब विचारण्यात आला.
पुणे-
खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात एमआरआय काढताना घेतलेल्या फोटोवरुन बराच गदारोळ सुरू आहे. शिवसेनेच्यावतीनं लीलावती रुग्णालय प्रशासनाला यावरुन जाब विचारण्यात आला. तसंच आज याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही यासंदर्भात नवनीत राणा यांना सुनावलं आहे. एमआरआय काढताना रुग्णालयाला अंधारात ठेवून फोटो काढणं चुकीचं आहे असं राजेश टोपे म्हणाले.
"सिटी स्कॅन, MRI या ठिकाणी जाऊन फोटो काढणं ही पद्धत मी आरोग्य मंत्री असताना कुठं पाहिलेली नाही. अशापद्धतीचं फोटो सेशन कुणी रुग्णालयाला अंधारात ठेवून दुसऱ्याने केलं असेल तर हेही चुकीचं आहे. यात राजकारण आणण्याचा प्रश्न नाही", असं राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर बोलत असताना कुणीही घाबरुन जाण्याची गरज नाही. रुग्णसंख्या वाढली तरी सौम्य लक्षणं असतील असा अनुमान काढण्यात आला आहे. महाराष्ट्राने याआधी मोठी रुग्णवाढ पाहिलेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी प्रशासन सज्ज आहे. चौथी लाट येणार असल्याचं सूतोवाच मी केलेलं नाही. सध्या खूप कमी वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.