रक्ताला चटावलेली ‘ती’ बस साताऱ्याचीच

By admin | Published: May 25, 2017 11:12 PM2017-05-25T23:12:09+5:302017-05-25T23:12:09+5:30

रक्ताला चटावलेली ‘ती’ बस साताऱ्याचीच

It is just 'Satara' of blood clothed in blood | रक्ताला चटावलेली ‘ती’ बस साताऱ्याचीच

रक्ताला चटावलेली ‘ती’ बस साताऱ्याचीच

Next

!जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोल्हापूर येथील गजबजलेल्या उमा टॉकीज चौकात बुधवारी बेधुंद एसटी चालकाने १४ वाहनांना धडकून दोघांना चिरडले. यात नऊजण गंभीर जखमी झाले. या घटनेने अंगावर थरकाप उडवणाऱ्या पुण्यातील संतोष माने प्रकरणाची आठवण झाली. पण ही गाडी मुळची सातारा विभागाचीच असून तिचा प्रवास ‘सातारा टू कोल्हापूर व्हाया पुणे’ झाला.
वाहन खासगी असो वा सार्वजनिक वाहतुकीचे. ज्या गाडीच्या भरवशावर दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करतो. जिच्या जीवावर संसार चालला आहे, त्या गाडीला चालक लक्ष्मीच समजतो. जिवापाड प्रेम करतो. जरा कुठं खुट झालं तरी चालकाच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याचं कारणही तसेच असते. अनेक चालक असे आहेत की, दहा-पंधरा वर्षे झाले तरी साधा ओरखडा पडलेला नसतो. मग अशा गाडीचे लाड होणारच ना? रिक्षा सुंदरीच्या माध्यमातून अशा गाड्या प्रकाशझोतात आलेल्या अनेकांनी पाहिल्या असतील. त्याचप्रमाणे काही गाड्या नेहमीच वादाविवादात सापडलेल्या असतात.
राज्य परिवहन महामंडळाची एसटी (एमएच १४ बीटी १५३२) ही त्यापैकीच एक. ही गाडी २०१२ पूर्वी सातारा विभागाच्या ताफ्यात होती. यांत्रिक परिस्थितीचा विचार करता ती, सुस्थितीत होती. त्यामुळे तिचा वापर बहुतांश वेळा ‘विना थांबा’साठी केला जात. २५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ही गाडी सातारा-स्वारगेट विनाथांबा फेरी घेऊन गेली होती. चालक गाडी स्वारगेटमध्ये उभी करुन दुसरी गेला असतानाच संतोष माने याने ही गाडी ताब्यात घेऊन पळविली. पुण्यातील भर रस्त्यावरुन वाटेत येतील ती वाहने, पादचाऱ्यांना उडवून सैरभैर चालवित होता. या घटनेमध्ये तब्बल नऊ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले.
राज्यभर थरकाप उडविणाऱ्या या घटनेने ही बस चर्चेत आली. पुणे न्यायालयात खटला चालणार होता. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी नको म्हणून ही गाडी घटना घडल्यानंतर पुणे विभागाकडे वर्ग करण्यात आली. पुणे न्यायालयात सुमारे पंधरा महिने खटला चालला. २०१३ मध्ये याचा निकाल लागला. अन् गाडी प्रवाशांचे सेवेत हजर झाली.
कालांतराने डिसेंबर २०१३ मध्ये ही गाडी कोल्हापूर विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली. या ठिकाणी तीन-साडेतीन वर्षे चांगली सेवा दिली. मात्र, बुधवारच्या घटनेने पुन्हा पुण्याच्या घटनेची आठवण करुन दिली.
चालक म्हणे नको रे बाबा...
पुणे विभागाने कोल्हापूर विभागाकडे गाडी कधी हस्तांतरीत केली, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ने पुण्याचे विभाग नियंत्रक नितीन महेंद्र यांना दुरध्वनी केला असता, ‘गाडी का हस्तांतरीत केली, हे सांगता येणार नाही,’ असे त्यांनी न विचारताच सांगितले. वास्तविक पाहता ही बस ताब्यात घेण्यास चालकच तयार नसायचे. चालकाच्या डोळ्यासमोर २५ जानेवारीची घटना उभी राहायची. त्यामुळे ती हस्तांतरीत केली असल्याचे स्वारगेटमधील चालकांमध्ये चर्चा सुरू होती.
त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागातील संभाजीनगर आगारात हस्तांतरीत केल्यानंतरही ज्या चालकांना पुण्यातील घटना व गाडी क्रमांक माहित आहे, ते गाडी ताब्यात घेण्यास तयार नसायचे.
११ जणांना उडविणारी गाडी भंगारात
पुणे आणि कोल्हापूर दोन घटनांमध्ये या गाडीमुळे अकराजणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले. त्यामुळे ही गाडी आता भंगारात काढायला हवी, अशी चर्चा सातारा बसस्थानकात चालक, वाहक अन् अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.
बुधवारचा योगायोग
पुणे येथे संतोष माने प्रकरण आणि कोल्हापुरातील घटना या दोन्ही घटनांमध्ये ज्याप्रकारे एमएच १४ बीटी १५३२ ही एकधागा आहे. तसाच आणखी एक योगायोग जुळून येत आहे. दोन्ही घटना बुधवारीच घडल्या होत्या.
सातारा बसस्थानकात चर्चेला उधान
सातारा बसस्थानक आणि पुणे, कोल्हापूर येथील अपघातग्रस्त गाडीचे जुने नाते आहे. त्यामुळे ही एसटी अमुक ठिकाणी घेऊन गेलो होतो. पण सुखरुप कशी आणली, अशा प्रकारच्या चर्चा चालक, वाहकांमध्ये सुरू होत्या.

Web Title: It is just 'Satara' of blood clothed in blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.