..हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही - राज ठाकरेंनी ठणकावले
By Admin | Published: September 10, 2015 06:05 PM2015-09-10T18:05:24+5:302015-09-10T18:12:41+5:30
महाराष्ट्रात कोणी काय खावे हे जैन धर्मियांनी ठरवू नये, हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही असं शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - महाराष्ट्रात कोणी काय खावे हे जैन धर्मियांनी ठरवू नये, हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही असं शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावले आहे. पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी असेल तर गणपती, श्रावण व नवरात्रौत्सव दरम्यानही मांसविक्रीवर बंदी घालणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मांसविक्री बंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा येथे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मांसविक्री बंदीवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मांसविक्री बंद होणार नाही, २ - ४ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी का घालायची, विक्रेत्यांनी अशी कोणतीही बंदी पाळू नये, या सर्व विक्रेत्यांना मनसे संरक्षण देईल अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. ग लोकांना चांगले रस्ते, सुरक्षा, पाणी, शिक्षण, रोजगार हवा आहे, पण दुर्दैवाने सत्ताधारी भाजपाला या मुद्द्यांपेक्षा भलत्याच मुद्द्यांमध्ये रस आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली. या वादाला जैन विरुद्ध हिंदू असा रंग देण्याचा प्रयत्न आहे, भाजपानेच हे सर्व पेरलंय व यातून भाजपालाच राजकीय लाभ मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयआरबी हा राजकीय पक्षांना फंड पुरवाणारी कंपनी आहे असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. सरकारविरोधी बोलण हा देशद्रोह ठरुच शकत नाही, लोकशाहीत अशा गोष्टी चालणारही नाहीत, प्रत्येक गोष्टीवर निर्बंध घातले जात आहेत, देशात व राज्यात मोगलाई आली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपा हा भारतीय जंत पक्ष आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. राकेश मारियांसारख्या तडफदार अधिका-याला तडकाफडकी हटवण्याची गरज नव्हती असेही त्यांनी नमूद केले.