आयटीचे जाळे राज्यभर विणावे
By admin | Published: April 6, 2016 05:00 AM2016-04-06T05:00:47+5:302016-04-06T05:00:47+5:30
आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे,
नवी मुंबई : आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. राज्यात तरुणांची संख्या अधिक असून, आयटी क्षेत्रात त्यांच्या बुद्धीचा वापर करून घेतल्यास महाराष्ट्राची छाप जगात पडेल, असा विश्वास त्यांनी ऐरोलीत व्यक्त केला.
येथील खासगी नॉलेज पार्कचे उद्घाटन व दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्यासह कंपनीचे संचालक पॉल हर्मलीन व इतर मान्यवर उपस्थित होते. आयटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात आयटी धोरण अधिक सक्षम केले जात आहे. नव्याने राबवल्या जाणाऱ्या या धोरणात आयटी कंपन्यांना अधिकाधिक सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे व्यक्त केली.
सध्या मुंबई, नवी मुंबई अशा ठरावीक शहरांमध्येच आयटी कंपन्या आपला जम बसवत आहेत. यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण शहरी भागांकडे धाव घेत आहेत. शिवाय काही ठरावीक शहरांचीच विशेष ओळख तयार होत आहे. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न करावेत. त्याकरिता नागपूर व सांगलीसारख्या शहरांचाही विचार व्हावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचवले. लोकसंख्येत तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. हे तरुण बुद्धीच्या बळावर राज्याला तंत्रज्ञानात पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)