गोवर, रुबेलाची सक्ती नाही, पण लस घेणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:56 AM2018-12-01T05:56:15+5:302018-12-01T05:56:26+5:30
आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; लस घेतल्यानंतर भोवळ आल्यास घाबरून जाऊ नका
मुंबई : गोवर, रुबेला लसीची सक्ती नसली तरी ती घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही बाधा होत नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले.
लसीकरणाचा कार्यक्रम राज्याच्या शाळांत राबविला जात आहे. ही लस दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याने पालक घाबरले. त्यावर डॉ. सावंत म्हणाले की, १४९ देशांत लसीकरणाची मोहीम राबविली गेली आहे. आपल्या २० राज्यांत लसीकरण झाले आहे. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने ही बनवली असून ती सुरक्षित आहे. पोलिओच्या डोसमुळे काही मुलांना जसा ताप येतो, तसे या लसीमुळे काही मुलांना तात्पुरती भोवळ येते, पण त्यामुळे घाबरू नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
का आवश्यक?
गोवर, रुबेला हे आजार सात ते आठ दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतरही आजारी मुलास न्युमोनिया, मेंदुज्वर, अंधत्व तथा मेंदूचा आजार होण्याची शक्यता असते. शिवाय, गर्भपात होणे किंवा मुलास जन्मत:च अपंगत्व येणे वा ते गतिमंद, कुपोषित असणे हे प्रकार होतात. त्यामुळेच लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
गोंदिया, बुलडाण्यात काही विद्यार्थ्यांना बाधा
गोवर-रुबेला लस दिल्यानंतर गोंदिया येथील स्टार इंटरनॅशनल शाळेतील ६ विद्यार्थ्यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. तर बुलडाणा जिल्ह्यात ४ दिवसांत २१ जणांना किरकोळ रिअॅक्शन आली, तरी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.