घरातील पार्टीत बाहेरील महिलांना नाचवणे गुन्हा नाही

By admin | Published: March 17, 2016 01:09 AM2016-03-17T01:09:04+5:302016-03-17T01:09:04+5:30

निवासी इमारतीमधील खासगी फ्लॅटमध्ये काही मित्रांनी मद्यपार्टीचे आयोजन करून, त्यात डिस्को लाइट व स्पीकर लावून बाहेरून आणलेल्या बायकांना तोकड्या कपड्यांत नाचविणे

It is not a crime to dancing women outside the indoor party | घरातील पार्टीत बाहेरील महिलांना नाचवणे गुन्हा नाही

घरातील पार्टीत बाहेरील महिलांना नाचवणे गुन्हा नाही

Next

मुंबई: निवासी इमारतीमधील खासगी फ्लॅटमध्ये काही मित्रांनी मद्यपार्टीचे आयोजन करून, त्यात डिस्को लाइट व स्पीकर लावून बाहेरून आणलेल्या बायकांना तोकड्या कपड्यांत नाचविणे व त्यांच्यावर पैसे उधळणे हा गुन्हा नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
फ्लॅटचे दरवाजे बंद करून आयोजित केल्या जाणाऱ्या अशा खासगी पार्टीचा शेजाऱ्यांना जोपर्यंत उपद्रव होत नाही किंवा तशी तक्रार कोणी करत नाही, तोपर्यंत अशा घटना फौजदारी कायद्याच्या कक्षेत येत नाहीत व पोलीस त्यात नाक खुपसू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. नरेश पाटील आणि न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आणि अंधेरी (प.) येथील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या अशाच एका पार्टीमध्ये सहभागी झालेल्या १३ जणांविरुद्ध अंबोली पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द केला.
कुरेशी कम्पाउंड, अंधेरी (प.) येथील एव्हरशाइन कॉस्मिक सोसायटीच्या फ्लॅट क्र. २०१ मध्ये अशी पार्टी सुरू असल्याची खबर मालवणी येथील एक पत्रकार जगजीत गिरमिले यांनी अंधेरीच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे केल्यानंतर अंबोली पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला होता.
त्या वेळी तेथे मद्यप्राशन करीत बसलेले १३ जण, झगमगते डीजे लाइट व स्पीकर आणि तोकड्या कपड्यांतील सहा महिला आढळल्या होत्या. पोलिसांनी या १३ जणांविरुद्ध भादंवि कलम २९४ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता.
हा गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘या गुन्ह्यासाठी आक्षेपार्ह अश्लील वर्तन सार्वजनिक ठिकाणी करणे व त्याचा इतरांना उपद्रव होणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. प्रस्तूत प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष धाडीनंतर नोंदविलेला ‘एफआयआर’ आहे तसा वाचला, तरी त्यावरून ही पार्टी सार्वजनिक ठिकाणी नव्हे, तर खासगी फ्लॅटमध्ये बंद दरवाजात सुरू होती, हे स्पष्ट होते. शिवाय यामुळे उपद्रव होत असल्याची आजूबाजूच्या कोणीही तक्रार केली नव्हती.’
या पार्टीत सहभागी असलेल्या ज्या १३ जणांविरुद्धचा गुन्हा रद्द झाला, त्यात अमरदीप सिंग चुढा (शिवडी), संजीव रामकृष्ण मयेकर (गिरगाव), राज महादेव बर्वे (ठाकूरद्वार), मांगेलाल तुनीलाल जैन (बोरीवली-प.), किशोर दुर्लभ गोहेर (जी.डी. देशमुख रोड), मनोज प्रकाश जाधव (सांताक्रुझ प.), डॉ. अनंत जे बिडवे (भायखळा), हिरेन केसलीकर (वसई), संजय सी. शुक्ला (विरार प.), अनिल डी. दळवी (भायखळा), सचिन एन. नयला व सिद्धार्थ एस. कांबळे (दोघे पालघर) आणि सुनीलकुमार पी. बोहरा (भोईवाडा, परळ) यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)

पोलिसांना शिक्षणाची गरज
- या प्रकरणी तपास करणारे पोलीस निरीक्षक न्यायालयात जातीने हजर होते. या घटनेतून आपल्याला कलम २९४ वगळता आपल्याला अन्य कोणताही गुन्हा नोंदवावासा वाटला नाही, असे त्यांनी न्यायमूर्तींना सांगितले. यावरून पोलिसांना कायदा समजावून सांगण्याची गरज लक्षात घेऊन, खंडपीठाने आपले निकालपत्र मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे माहितीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले.

Web Title: It is not a crime to dancing women outside the indoor party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.