राष्ट्रीय निर्णयाचे मार्केटिंग करणे योग्य नव्हे
By Admin | Published: November 18, 2016 06:16 AM2016-11-18T06:16:18+5:302016-11-18T06:16:18+5:30
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनव्यवहारातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे.
पुणे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनव्यवहारातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. जनहितासाठी असे निर्णय घेणे हे पंतप्रधानांचे कर्तव्यच असते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवतीभवती असलेल्या लोकांकडून या निर्णयाचे मार्केटिंग केले जात आहे. राष्ट्रीय कामाचे मार्केटिंग करणे योग्य नाही, अशा शब्दांत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोदी समर्थकांवर टीका केली.
मी मोदीदलाल किंवा मोदीविरोधक नाही पण जर मोदी चांगले काम करीत असतील तर त्यांचे मी नक्कीच समर्थन करतो, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. हा सर्वस्वी राष्ट्रीय निर्णय आहे. त्या निर्णयाचे मार्केटिंग करणे योग्य नाही, असे सांगून सबनीस यांनी ‘काँग्रेसपेक्षा भाजपा सरकारचे आर्थिक घोटाळे अधिक प्रमाणात समोर येत नसले तरी पडद्याआड ते घडत नसतीलच असे नाही’ अशी टिप्पणी केली.
आत्तापर्यंत सरकारच्या तिजोरीत ५४ हजार कोटी रुपयांचे काळे धन जमा झाले आहे. तो पैसा टोल फ्री क्रमांक काढून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, श्रीमंत लोकांना पश्चात्तापाची संधी द्यावी, त्यांच्याकडून पैसा जमा करून घेताना कसलीही चौकशी करू नये अशी मागणी सबनीस यांनी केली.