सवत आणणे हा छळ नव्हे
By Admin | Published: November 6, 2015 01:26 AM2015-11-06T01:26:11+5:302015-11-06T01:26:11+5:30
‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने
मुंबई : ‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याच्या खटल्यात तिच्या सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता केली आहे.
साधना संजीव कांबळे विवाहितेने जुलै १९९४ मध्ये राधानगर, जुनी सांगवी, पुणे येथे राहणारे तिचे पती संजीव, तेथेच राहणारी नणंद माई उर्फ पल्लवी, एसिक स्टाफ कॉलनी वागळे इस्टेट ठाणे (प.) येथे राहणारी आणखी एक नणंद निर्मला व नणंदांचे पती अनुक्रमे अशोक मोरे आणि अशोक ननावरे यांच्यावर भादंवि कलम ४९८ अ व ३४ अन्वये खटला चालला होता. पिंपरी येथील प्रथम वर्र्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी एप्रिल २००१ मध्ये सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात केलेले अपील फेटाळताना न्या. एस. बी. शुक्रे यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.
साधनाने केलेल्या फिर्यादीत इतर आरोपांखेरीज पतीने सवत घरात आणल्याचाही आरोप होता. २६ जून १९९४ रोजी पती संजीव पुण्याच्या राहत्या घरी एका परस्त्रीला सोबत घेऊन आला व त्याने आपले वडील आणि काकांच्या समक्ष ती आपली दुसरी पत्नी असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर त्याने आपल्याला घरातून चालते व्हायला सांगून, तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे साधनाचे म्हणणे होते. यावर न्या. शुक्रे म्हणतात की, ‘पतीने दुसऱ्या स्त्रीला सवत म्हणून घरात आणले हे सिद्ध झाले, तरी त्यातून त्याने तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा अर्थ निघतोच असे नाही. भादंवि कलम ४९८ अ अन्वये या गुन्ह्यासाठी विवाहिता आत्महत्येस प्रवृत्त होईल, किंवा स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट करेल किंवा तिच्यावर तशी वेळ येऊ नये, यासाठी तिच्या माहेरच्यांना सासरच्यांची मागणी मान्य करण्यास भाग पडावे, अशा प्रकारचा छळ करणाऱ्याची मानसिकता तशी होती, ही पुराव्याने सिद्ध व्हायला हवे.’
न्या. शुक्रे लिहितात की, ‘पत्नीने मानसिक संतुलन ढळू न देता किंवा आपले स्वत:चे काही बरेवाईट न करता, राजीखुशीने किंवा मनाविरुद्धही सवतीचा स्वीकार केल्याचेही पाहायला मिळते. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीवर हे अवलंबून आहे. स्वत: साधना, तिचे वडील विष्णू वाघमारे व काका मधुकर यांच्या साक्षींंवरून तिचा सवतीसंबंधीचा आरोप नि:संशयपणे सिद्ध होत नाही.’ (विशेष प्रतिनिधी)
पैशाचा आरोपही निराधार : माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केला व त्यांनी खूपच तगादा लावल्यावर माहेरच्यांनी नाइलाजाने त्यांना पैसे दिले, असाही साधनाचा आरोप होता, परंतु हा आरोपही सप्रमाण सिद्ध होत नसल्याचे नमूद करताना न्यायालयाने म्हटले की, ‘नेमके किती पैसे दिले, यावर साधनाचे वडील आणि भाऊ यांच्या साक्षीत एकवाक्यता नाही. एकाने १५ हजार दिल्याचे तर दुसऱ्याने १३ हजार दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर एकाने हे पैसे बँकेतून तर दुसऱ्याने सोसायटीतून काढून दिल्याचे सांगितले.’