गुप्तचर यंत्रणेमुळेच यशस्वी सैन्य कारवाया शक्य : लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 08:24 PM2019-12-21T20:24:33+5:302019-12-21T20:29:40+5:30
जेव्हा एखाच्या मोहिमेची तयारी करायची असते, तेव्हा आम्ही ‘खबर दुश्मन के बारे में’ असे विचारत असतो.
पुणे : ‘‘गुप्तचर यंत्रणा आणि सैन्यकारवाया या हातात हात मिळून कार्य करीत असतात. जेव्हा एखाच्या मोहिमेची तयारी करायची असते, तेव्हा आम्ही ‘खबर दुश्मन के बारे में’ असे विचारत असतो. ती खबर आम्हाला गुप्तचर यंत्रणा पुरवत असते. त्यामुळे मी ठामपणे सांगू इच्छितो, की कुठलीही सैन्यकारवाई असो तिचे यश हे गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या गोपनीय माहितीवर अवलंबून असते. ही माहिती आम्हाला इंटेलिजन्स ब्यूरो आणि रीसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’ या गुप्तचर संस्थांकडून मिळत असते, असे प्रतिपादन लष्कराचे उपप्रमुख आणि होणारे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने वरिष्ठ पत्रकार नितीन गोखलेलिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी रीसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन, राज्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते.
लेफ्टनंट जनरल नरवणे म्हणाले, ‘‘गुप्तहेर विभागाच्या या सहकार्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी आहोत. गुप्तचर यंत्रणांचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा जेस्म बाँड आणि त्याचे ग्लॅमरस आयुष्य पुढे येते. एवढेच नव्हे, तर बंदुका, मारामारी असा समज एका हेराबद्दल असतो. मात्र, वास्तविकतेत असे नाही. गुप्तहेर हा नेहमीच पडद्यामागे राहून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्य करीत असतो. त्यांनी दिलेली माहिती ही देशासाठी तसेच सैन्यदलासाठी मोलाची असते. या पुस्तकात रॉचे निर्माते आर. एन. काव यांच्या जीवनाचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे.
‘रा’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन म्हणाले, ‘‘भारतीय गुप्तचर विभागाने अनेक मोहिमा यशस्वी केल्या; मात्र त्यांच्या मोहिमांची माहिती देणारी कुठलीच कागदपत्रे उघडक करण्यात आलेली नाहीत. पाकिस्तानविरोधात जिंकलेली युद्धे, बांगलादेशाची निर्मिती, ऑपरेशन गोल्डन टेम्पल यासारख्या मोहिमांत महत्त्वाचा सहभाग आहे. जेव्हा इतिहासाची मांडणी करायची असते, तेव्हा ही गोपनीय कागदपत्रे महत्त्वाची असतात. एका ठरावीक कालावधीनंतर ती उघडकीस आणणे गरजेचे असते. भारतातील गोपनीय माहिती कायदा हा ब्रिटिशकाळातील आहे. या कायद्यानुसार आजही अनेक प्रकारची माहिती ही गुपित ठेवली जाते. मात्र, आज रशिया, अमेरिका, इंग्लंड यासारखे देश त्यांच्या गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांच्या माहितीची कागदपत्रे एका ठराविक काळानंतर उघड करतात. आपल्याकडेही युद्धाशी संबंधित बाबी आणि अतिमहत्त्वाची माहिती वगळता ही माहितीपत्रे उघड व्हायला हवी. त्यासाठी लोकशाहीमध्ये नवे कायदे करण्याची आज गरज आहे. वीस वर्षांनंतर ही कागदपत्रे खुली करून त्याचा उपयोग होणार नाही, तर पाच ते दहा वर्षांत ती खुली करण्यात यावीत.’’
जयंत उमराणीकर म्हणाले, ‘‘आर. एन. काव यांनी रीसर्च अँड अॅनालिसीसची स्थापना केली. ही संस्था त्यांनी उभी करताना देशहित जपले. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. गुप्तचर विभागाच्या कामगिरीवर बोलताना नेहमीच त्यांची आठवण होईल, कारण त्यांची निष्ठा ही त्यांच्या विचारांशी, देशाशी होती; राजकारण्यांशी नव्हती.’’
....................
‘रॉ’च्या भरती प्रक्रियेत बदल व्हावा
सीआयए, मोसाद यासारख्या परदेशातील आघाडीच्या गुप्तहेर संस्था माणसे निवडताना सर्वसामान्य नागरिकांना निवडतात. मात्र, आपल्याकडे भारतीय पोलीस सेवेतून रॉवर अधिकारी नेमले जातात. गुप्तचर यंत्रणेसाठी आपल्याला सामान्य माणसे आवश्यक असतात. एखादा शिक्षित हा चांगला गुप्तचर असेलच असे नाही, त्यापेक्षा कमी शिक्षित असलेला नागरिकही चांगला गुप्तहेर बनू शकतो. यामुळे भारतात रॉसाठी असलेल्या निवड प्रक्रियेत बदल व्हावा, अशी अपेक्षा ‘रॉ’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन यांनी व्यक्त केली.