मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन नव्या वर्षातच घडण्याची शक्यता

By admin | Published: December 27, 2016 02:01 AM2016-12-27T02:01:48+5:302016-12-27T02:01:48+5:30

गेल्या काही महिन्यांपासून पेंग्विनच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतीक्षा आता पुढच्या वर्षीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठीचे भायखळ्यातील राणीच्या

It is possible that Pankajwani's visas will be held in New Year only | मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन नव्या वर्षातच घडण्याची शक्यता

मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन नव्या वर्षातच घडण्याची शक्यता

Next

- शेफाली परब-पंडित, मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून पेंग्विनच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतीक्षा आता पुढच्या वर्षीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठीचे भायखळ्यातील राणीच्या बागेतील काचेचे पिंजरे अद्याप बनलेले नाहीत़ त्यासाठी परदेशातून बोलाविलेले तंत्रज्ञ मुंबईत पोहोचले नसल्याने काच बसविण्याचे काम लांबणीवर पडले आहे़
आता हे काम नव्या वर्षात मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठमोठ्या प्रकल्पांचे बार उडविणाऱ्या शिवसेनेच्या स्वप्नाला सुरुंग लागला आहे़ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन अवतरले़ महापालिकेची निवडणूक २०१७मध्ये असल्याने त्यापूर्वी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्याचे शिवसेनेचे लक्ष्य आहे़ मात्र दक्षिण कोरियातून आणलेल्या हॅम्बोल्ट जातीच्या आठ पेंग्विनपैकी एकाचा
२४ आॅक्टोबरला मृत्यू झाला़ आतड्यांना संसर्ग झाल्याने हा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात उजेडात आले़ त्यामुळे पेंग्विनसह सर्वच प्राण्यांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राणीच्या बागेचा परवाना रद्द होण्याचे संकट ओढावले़
पेंग्विनच्या दर्शनासाठी राणीबागेचे द्वार खुलण्याआधीच हा प्रकल्प चर्चेत आला़ पेंग्विनची देखभाल व त्यांच्या राहण्यायोग्य जागा तयार करणारी कंपनीच बोगस असल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले़ विरोधकांबरोबरच भाजपाकडूनही होणाऱ्या टीकेमुळे निवडणुकीपूर्वी पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना घडविण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरूआहे़
मात्र अद्याप या पिंजऱ्यासाठी आणलेली काच बसविणारे थायलंडचे तंत्रज्ञ मुंबईत पोहोचलेले नाहीत़
तंत्रज्ञ आल्यानंतरही हे काम पूर्ण होण्यास किमान आठवडा
लागणार आहे़ दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे श्रेय शिवसेनेला घेता येणार नाही़

शिवसेनेच्या स्वप्नाला सुरुंग : पेंग्विनला मुंबईत आणण्याचे शिवसेनेचे प्रयत्न २०१६मध्ये फळास आले़ परंतु एका पेंग्विनच्या मृत्यूमुळे शिवसेनेला टीकेचे धनी बनावे लागले आहे़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना घडवून पेंग्विन सुस्थितीत असल्याचे दाखविण्याची सेनेला गरज आहे़ मात्र विविध कारणांमुळे उद्घाटनाचा सोहळा लांबणीवर पडत आहे़

दोन दिवसांत कामाला सुरुवात
पिंजरा उभारण्यासाठी लागणारे सामान समुद्रामार्गे मुंबईत आणण्यात येत असल्याने हा विलंब झाला़ थायलंडचे तंत्रज्ञ दोन दिवसांत मुंबईत येतील़ आठवड्याभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती राणीबागेतून मिळाली़

...तर अधिकाऱ्यांकडून उद्घाटन? : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांसाठी खुले करायचे झाल्यास राजकीय पक्षांना त्यात सहभागी होता येणार नाही़ अशावेळी पालिका अधिकाऱ्यांनाच हा कार्यक्रम पार पाडावा लागेल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले़

बर्फाळ प्रदेशाची निर्मिती
पेरू आणि चिली या देशांत पेंग्विन सापडतात़ या पक्ष्यांसाठी राणीच्या बागेत असलेल्या पिंजऱ्याला शंभर चौरस मीटरची काच असेल. पिंजरा अर्धा पाण्याने भरून त्यामध्ये रेती आणि समुद्री खडकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे़

- दक्षिण कोरियाच्या सेऊल येथील कोएक्स मत्स्यालयातून आठ तासांचा विमानप्रवास करून हॅम्बोल्ट प्रजातीच्या आठ पेंग्विनचे दशकभराच्या प्रयत्नांनंतर २६ जुलै २०१६ रोजी मुंबईत आगमन झाले. त्यासाठी पालिकेने २.५७ कोटी रुपये खर्च केले आहेत.

- प्राणिसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळमजल्यावर सुमारे १७०० चौरसफूट क्षेत्रफळाचा वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष बनविला आहे़ त्याचे तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे़ आॅस्ट्रेलियातील आॅशियानीस या कंपनीला पाच वर्षांसाठी पेंग्विनच्या देखरेखीचे कंत्राट दिले असून, पालिका त्यासाठी २० कोटी रुपये खर्च करणार आहे़

Web Title: It is possible that Pankajwani's visas will be held in New Year only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.