कोयनेचे पाणी मुंबईपर्यंतही नेणे शक्य

By admin | Published: February 23, 2015 09:52 PM2015-02-23T21:52:36+5:302015-02-24T00:00:54+5:30

रवींद्र वायकर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देण्याचे आश्वासन

It is possible to take coconut water to Mumbai too | कोयनेचे पाणी मुंबईपर्यंतही नेणे शक्य

कोयनेचे पाणी मुंबईपर्यंतही नेणे शक्य

Next

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देणे तसेच महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम तातडीने सुरु करणे ही कामे सर्वोच्च प्राधान्याने करण्यात येतील, असा निर्धार गृहनिर्माण, उच्च, तंत्रशिक्षणमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. त्याचप्रमाणे कोयनेतील पाणी रत्नागिरी, रायगड, एवढेच नव्हे तर मुंबईपर्यंतही नेणे शक्य आहे, असे प्रतिपादन वायकर यांनी केले.विकास कार्यक्रमांना गती देणे तसेच तालुकास्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वायकर हे सोमवारी चार दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या जिल्हा दौऱ्यात ते रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख-संगमेश्वर, गुहागर येथे तालुकास्तरीय जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास तसेच सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात आला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.वायकर म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची मोजणी, भूसंपादनासह येणारे सर्व अडथळे दूर केले जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आणि समन्वय ठेवून काम करावे, अशी सूचना केली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमीन सीमांकनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जमीनमोजणी आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेत निधीची उपलब्धता किंवा धोरणात्मक अडचणी आल्यास त्या मंत्रालयस्तरावर तातडीने दूर करण्यात येतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिला.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप या तीन टप्यात सुरु असून, इंदापूर ते कशेडी हे अंतर ७७ किलोमीटरचे आहे. यापैकी १९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, प्रस्तावित कशेडी बोगदा १.७२ किलोमीटरचा आहे. भविष्यातील वाहतूक वाढीचा विचार करुन येथे तीन पदरांचे दोन बोगदे असतील. यामुळे घाटातील वळणाचे अंतर कमी होईल. बोगद्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी रायगड जिल्ह्यातील भोगाव व कातळी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी आणि खवटी या चार गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील कोयना, पोफळी, कोळकेवाडी आणि कोळकेवाडी टप्पा -४ या चार ठिकाणी कोयनेच्या पाण्यावर अनुक्रमे ४० मेगावॅट, ६०० मेगावॅट, ३२० मेगावॅट आणि १००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या १९६० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी किमान ५०० ते कमाल ३ हजार एमएलडी पाणी सोडले जाते. या सोडलेल्या पाण्यापैकी अपवादवगळता जवळपास सर्व पाणी समुद्रात वाया जाते. पाण्याचा इतका मोठा अपव्यय अव्यवहार्य असून, त्यावर तोडगा काढला पाहिजे. या पाण्याचा वापर चिपळूण तालुका, तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकूण धरणांची संख्या, अपूर्ण धरणांची संख्या, कामे बंद असलेली धरणांची संख्या, धरणात उपलब्ध पाणीसाठा या सगळ्यांचा विचार करुन पाण्याचा वापर शेतीसाठी कसा वाढवता येईल, अधिकाधिक जमीन लागवडीखाली कशी आणता येईल, याचाही जलसंपदा, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, असे त्यांनी बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)

समिती स्थापणार
जिल्ह्याची गरज भागवून उरलेले पाणी मुंबईसारख्या महानगराला उपलब्ध करण्याचाही विचार केला पाहिजे. ही पाणी वाहून नेण्याची योजना व्यवहार्य असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


काम वेगाने सुरू
कशेडी बोगद्याचे काम युद्धपातळीवर करण्याचा निर्धार.
महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप असे सुरु.
१९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, कशेडी बोगदा १.७२चा.
कोयनेतील पाण्याचा वापर चिपळूण, तसेच रत्नागिरी व रायगडमधील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु.

Web Title: It is possible to take coconut water to Mumbai too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.