Uddhav Thackeray : ...यासाठी थिजलेली मनं आन् गोठलेले रक्तच हवे; 'अशा' रक्ताची येथे गरजच नाही, ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 08:47 PM2022-10-09T20:47:52+5:302022-10-09T20:50:38+5:30
या देशात, मी हिंदू आहे, असे म्हणण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती हिंमत, जी शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली आहे. हे हिंदूत्व असेच उभे राहिलेले नाही.
चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. असे म्हणत, शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे गटावर जबरदस्त हल्ला चढवला. ते फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी बोलत होते.
सध्या, खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे गटाची, की एकनाथ शिंदे गटाची, हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. काल आयोगाने निर्णय होईपर्यंत शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. यानंतर, आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायांपैकी 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते. यानुसार उद्धव ठाकरे गटाने चिन्हासाठी आणि पक्षाच्या नावासाठीही आयोगाकडे पर्याय दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला.
गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही -
उद्धव ठाकरे म्हणाले, "काल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, शिवसेनेचे नाव गोठवले आणि चिन्हही गोठवले. शिवसेना प्रमुख ज्या निवडणूक चिन्हाची धनुष्यबाणाची पूजा करत होते, तो धनुष्यबाण आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. पण चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. असे म्हणत, शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही. उलट्या काळजाची माणसं, जी आज फिरत आहेत. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा या उलट्या काळजाच्या माणसांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले. या मागे जी महाशक्ती आहे, त्यांनाही आनंद होत असेल, की बघा आम्ही करून दाखवले. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
शिवसेना प्रमुखांनी दिलेली 'ती' हिंमत तुम्ही गोठवली -
एवढेच नाही, तर ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला. ज्या शिवसेनेने मराठी मनं पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, त्या शिवसेनेचा घात तुम्ही करायला निघालात. शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं. काय मिळणार तुम्हाला. या देशात, मी हिंदू आहे, असे म्हणण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती हिंमत, जी शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली आहे. हे हिंदूत्व असेच उभे राहिलेले नाही. यासाठी शिवसेना प्रमुखांनी अनेक धोके पत्करले आहेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेना आणि तुमचा संबंध काय? -
मुळात, शिवसेना आणि तुमचा संबंध काय? जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं, तेच विचार घेऊन मी पुढे जात असताना, तुम्ही त्याचा घात करता? असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या 3 चिन्हांना पसंती दिली असल्याचे आणि पक्षासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(प्रबोधनकार ठाकरे) या 3 नावांचा पर्याय दिला असल्याचेही सांगितले.