मारेकरी सापडत नाहीत हेच खेदजनक

By admin | Published: April 16, 2015 01:53 AM2015-04-16T01:53:40+5:302015-04-16T01:53:40+5:30

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला गुरुवारी दोन महिने झाले आहेत. तरीही हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

It is sad that the killers can not be found | मारेकरी सापडत नाहीत हेच खेदजनक

मारेकरी सापडत नाहीत हेच खेदजनक

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला गुरुवारी दोन महिने झाले आहेत. तरीही हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा तपास करीत असताना मारेकरी सापडत नाहीत, याची खंत वाटते, अशी उद्विग्नता त्यांच्या पत्नी श्रीमती उमा पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे हे गंभीर जखमी झाले होते. मुंबई येथे उपचार सुरु असताना २० फेब्रुवारी रोजी पानसरे यांचे निधन झाले. पानसरे यांची हत्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का, अशी शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व पातळ्यांवर माहिती घेतली. तथापि, या संदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदार उमा पानसरे यांच्याकडून तपास अधिकारी अंकित गोयल यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडूनही अद्याप पूर्णत: माहिती प्राप्त झालेली नाही.
पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त फोन कॉल्सची चौकशी
केली. सराईत गुन्हेगार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती, नातेवाईक, आदींसह सुमारे ६०० लोकांचे जबाब घेतले. चार संशयास्पद दुचाकी जप्त केल्या आहेत. राज्यभरातील २५ विशेष पथके याप्रकरणी मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलीस कसोशीने करीत असताना गेल्या दोन महिन्यांत त्यांना कोणताच पुरावा मिळू शकलेला नाही. इतर खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये एकही पुरावा नसतानाही पोलीस मारेकऱ्यांना शोधून काढतात. मग पानसरे यांच्या हत्येचे मारेकरी त्यांना का सापडत नाहीत...? याचे आम्हांला कोडे पडले आहे.- स्मिता पानसरे

पानसरे यांच्या हल्ल्याला दोन महिने पूर्ण होत असले तरी आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्हाला खात्री आहे की, लवकरच आम्ही या प्रकरणाचा छडा लावू.
- अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक

Web Title: It is sad that the killers can not be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.