पुत्र असावा तर पार्थ पवारांसारखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:19 AM2019-04-10T06:19:36+5:302019-04-10T06:19:57+5:30
साडेसोळा कोटींची मालमत्ता; शरद आजोबा-सुप्रिया आत्याला कर्ज
पुणे : पार्थ पवार. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीत पाच कोटी रुपये मोजून तब्बल १७ हजार १४० चौरस फुटांचा बंगला खरेदी केला.
शरद पवार हे पार्थ यांचे आजोबा. पंचाहत्तरी ओलांडलेल्या आपल्या आजोबांनाही या नातवाने पन्नास लाख रुपये कर्ज दिले आहे. एवढेच नव्हे तर जेमतेम वयाच्या अठराव्या वर्षी पार्थ यांनी मुळशीत सात लाख रुपयांची शेतजमीनही खरेदी केली आहे.
पार्थ यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय (कोणता ते नमूद केलेले नाही) आहे. बारामती, मुळशीत एकूण पाच हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन पार्थ यांच्याकडे आहे. लोकसभेची उमेदवारी दाखल करताना मंगळवारी (दि. ९) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पार्थ यांच्या मालमत्तेची माहिती समोर आली. पार्थ यांची स्वसंपादित संपत्ती १३ कोटी ६१ लाख ४९ हजार आहे. त्यांची वारसाप्राप्त संपत्ती सुमारे २ कोटी ८१ लाख ३५ हजार आहे.
पार्थ यांनी त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांनाही वीस लाख रुपये दिले आहेत.‘शेअर ट्रान्सफर’साठी ही रक्कम ‘अॅडव्हान्स’ म्हणून दिल्याचे म्हटले आहे. शरद पवारांनाही शेअर ट्रान्सफरसाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत.
आई आणि भावाचे कर्ज
पार्थ यांना त्यांची आई सुनेत्रा यांनी सुमारे ७ कोटी १३ लाख आणि भाऊ जय यांनी २ कोटी २३ लाख रुपये कर्जाऊ दिले आहेत. श्री छत्रपती साखर कारखाना, काट्याची वाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, कान्हेरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, बारामती सहकारी बँक लि., अजंठा कन्सॉलिडेटेड प्रा.लि. आणि सेंथिल जेडी डायग्नॉस्टिक प्रा. लि. या कंपन्यांचे शेयर्स पार्थ यांच्याकडे आहेत. तर प्रिन्स रियॅलिटी कन्सलटंट्स, जेपीपी युनायटेड, एव्हीए ग्लोबल लॉजिस्टिकस या कंपन्यांमध्ये त्यांची थेट गुंतवणूक आहे.