भाजपाला उमेदवार मिळू नयेत हे दुर्दैव
By admin | Published: January 3, 2017 06:33 AM2017-01-03T06:33:34+5:302017-01-03T06:33:34+5:30
ज्या भाजपाचा जन्म १९५२ मध्ये झाला, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी अजूनही उमेदवार मिळू नये, हे दुर्दैैव आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले.
पुणे : ज्या भाजपाचा जन्म १९५२ मध्ये झाला, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी अजूनही उमेदवार मिळू नये, हे दुर्दैैव आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले. आता पालिका निवडणुकीसाठी मनसेचे लोक पळवित आहेत, मात्र माझ्याकडे खूप लोक आहेत. भाजपाच्या लोकांना केवळ घोषणा करायची हौस आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी भाजपाच्या इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यावर जोरदार टीका केली.
भांडारकर रस्त्यावरील मनसेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे उपस्थित होते. नोटाबंदी, राम मंदिर, शिवस्मारक आदी मुद्द्यांवर ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान भाषण देत असताना त्यांच्या देहबोलीवरून ते जाणवत होते. भाजपाच्या नेत्यांना लोकप्रिय घोषणा करण्याची हौस आहे. राम मंदिर बांधण्याची घोषणा करून त्यांनी अनेक खासदार निवडून आणले, मात्र पूर्ण बहुमत असताना त्यांना अजून राम मंदिर उभारता आले नाही अन् मुंबईतल्या एका स्टेशनला त्यांनी राम मंदिर हे नाव दिले.’’
राज्य सरकार शिवस्मारक उभारणी, मेट्रो करणार अशा अनेक घोषणा करीत आहे. मात्र त्यासाठी लागणारा पैसा ते कुठून आणणार आहे, हे कुणीच विचारत नाही. शिवस्मारकात उभारला जाणारा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल, असा दावा भाजपावाले करीत आहेत, मात्र त्यासाठी योग्य तो अभ्यास त्यांनी केलेला नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.
जात, धर्म, भाषा आदी मुद्द्यांवर मते मागू नयेत, असे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्याबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी सेवा देताना मराठी भाषेचा वापर करावा यासाठी आंदोलन केले तर त्यात गैर काय.’’