केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये आहे काय?, माध्यमांत रंगली दिवसभर चर्चा; लोकमतकडे पत्राची प्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:21 AM2021-08-15T08:21:04+5:302021-08-15T08:21:29+5:30
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली
मुंबई : राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडथळ्यांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचे वृत्त लोकमतने दिल्यानंतर शनिवारी दिवसभर या पत्राची सगळ्या माध्यमांवर चर्चा सुरू होती. या पत्रातील मुद्दे चर्चेचे ठरले आहेत.
नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिल्याची माहिती आहे. गृह विभागाने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना १३ ऑगस्टला एक पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत, विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडत आहेत आदी तक्रारीबाबत अहवाल मागविण्यात आला आहे.
अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचाही समावेश आहे. परंतु या बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.
पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते, अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
गडकरी यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश लगेच दिलेले आहेत. या चौकशीत या प्रकरणात खरेच शिवसैनिक आहेत की, उगाच बोंबाबोंब केली जात आहे, ते बाहेर येईल. परंतु गडकरी यांनी शिवसेनेचा उल्लेख करायला नको होता. शिवसेनेचा विकासाला विरोध नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अधिकाऱ्यांना काळे फासणारे, कंत्राटदार, अधिकाऱ्यांना उठाबशा काढायला लावणारे भाजपसोबत आहेत, त्या बाबत तुम्ही गप्प का?
- खा. अरविंद सावंत,
मुख्य प्रवक्ते, शिवसेना
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा वीस वर्षांपूर्वीचा मुद्दा होता. आज गुन्हेगारांचे राजकियीकरण झाले आहे. काही गुन्हेगार राजकारणात आले आहेत किंवा नेत्यांची चमचेगिरी करून खंडणी वसूल करणे, ब्लॅकमेलिंग करणे असे प्रकार घडत आहेत. अशांना मकोकाअंतर्गत तत्काळ अटक केली पाहिजे.
- सुधीर मुनगंटीवार,
माजी मंत्री व ज्येष्ठ नेते, भाजप
या विषयावर माझी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. मी एवढेच सांगते की माझ्या मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाची ९० टक्के
कामे पूर्ण झालेली आहेत. काही ठिकाणी लोकांचा विरोध असल्याने कामे थांबलेली होती.
- भावना गवळी, शिवसेना खासदार, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ