‘त्या’ मुलीचा संभ्रम झाल्याची शक्यता
By admin | Published: September 24, 2016 03:59 AM2016-09-24T03:59:11+5:302016-09-24T03:59:11+5:30
उरणमध्ये संशयित दहशतवादी आल्याची शक्यता वर्तवणारी ‘ती’ विद्यार्थिनी काही दिवसांपासून सतत उरी हल्ल्याच्या बातम्या बघत होती.
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- उरणमध्ये संशयित दहशतवादी आल्याची शक्यता वर्तवणारी ‘ती’ विद्यार्थिनी काही दिवसांपासून सतत उरी हल्ल्याच्या बातम्या बघत होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी तिचा संभ्रम झाल्याची शक्यतादेखील पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
उरण परिसरात दहशतवादी आल्याची माहिती उरण एज्युुकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनीने दिली आहे. गुरुवारी सकाळी ती शाळेत येत असताना पाच संशयित व्यक्ती रस्त्यालगत उभ्या होत्या. त्यांच्या खांद्यावर बंदुकीसारखी वस्तू होती व ते हल्ल्याची चर्चा करीत होते, अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांची मोठी फौज उरणमध्ये दाखल झाली आहे. शिवाय नेव्हीकडूनही परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
गुरुवारपासून उरणमधील घरोघरी, लॉज, हॉटेल व संशयित स्थळांची पाहणी करण्यात येत आहे. त्याकरिता गुन्हे शाखेची विविध पथके कार्यरत करण्यात आलेली आहेत. परंतु तपासात काहीही संशयास्पद हाती लागलेले नाही. त्यामुळे मुलीने जे पाहिले तो तिचा भ्रम असावा, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. तक्रारदार विद्यार्थिनी सतत उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या पाहत होती. शिवाय गुरुवारी सकाळी ती शाळेत जात असताना पाऊस पडत होता. या वेळी भर पावसात तिने रस्त्यालगत उभे असलेले पाच जण पाहिले. परंतु त्यांचे चेहरे ती पाहू शकलेली नाही. कदाचित काही बुरखाधारी पाहून ते दहशतवादी असावेत असा समज तिचा झाल्याची शक्यता आहे. परंतु संशयातसुद्धा हलगर्जी नको म्हणून पोलिसांकडून परिसरात कोम्ंिबग आॅपरेशन केले जात आहे.
>संशयित दहशतवाद्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केलेले नाही. मुलीने सांगितलेले संशयित दहशतवादी बुरख्यात होते. त्यामुळे त्यांचे रेखाचित्र तयार करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.