‘त्या’ बेपत्ता युवकांबाबत पूर्ण चौकशी होईपर्यंत बोलणे अयोग्यच
By admin | Published: July 18, 2014 02:49 AM2014-07-18T02:49:11+5:302014-07-18T02:49:11+5:30
इराकमधील धार्मिक यात्रेसाठी ४० जण गेले होते. त्यातील ३६ जण परत आले असून कल्याणातील ४ युवक बेपत्ता झाले आहेत.
ठाणे : इराकमधील धार्मिक यात्रेसाठी ४० जण गेले होते. त्यातील ३६ जण परत आले असून कल्याणातील ४ युवक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या पालकांनी याबाबत तक्रार केली आहे. त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाष्य करणे अयोग्य आहे. हे प्रकरण समोर ठेवून मुंब्रा आणि भिवंडीतून अन्य मुलेही बेपत्ता झाल्याची काही वृत्ते येत आहेत. ती चुकीची असून त्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. याबाबत वृत्त देताना प्रसारमाध्यमांनी भान बाळगावे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’च्या उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.
ठाणे शहर पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’चा शुभारंभ गृहमंत्र्यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे झाला. या वेळी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे, ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे, ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता, अभिनेते सुनील शेट्टी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. रवींद्र सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) ज्ञानेश्वर फडतरे आदी वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बोलताना, हे युनिट राज्याला नाहीतर देशाला मार्गदर्शक ठरेल, असे काम करण्याच्या सूचना ठाणे पोलिसांना त्यांनी केल्या आहेत. ठाणे शहर बालकामगार व अत्याचारमुक्त झाल्यास त्याला नवीन ओळख मिळेल आणि देशातील पहिले शहर ठरेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच काम करण्यास लहान मुलांना चटके देणाऱ्यांवर दंडुके चालवावे, त्याचबरोबर व्यवस्थापकांना पकडण्याबरोबरच त्यांच्या मालकांनाही पकडण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. विशेष बालकल्याण विभागाचे बजेट कोट्यवधींच्या घरात असतानाही राज्यातील सुधारगृहांची अवस्था दयनीय असल्याची खंतही व्यक्त केली. राज्यात चांगली पोलीस यंत्रणा समाजाला पाहण्यास मिळावी, यासाठी तीन प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. त्यासाठी ठाणे, मुंबई आणि पुण्याची निवड केली असून त्यानंतर औरंगाबाद, नागपूरची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, समस्या लक्षात घेऊन तेथील सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सुरक्षित राज्य म्हणून पुन्हा महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)