मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:55 PM2018-08-30T22:55:35+5:302018-08-30T22:55:45+5:30
मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
औरंगाबाद- मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच औरंगाबाद येथे घडवून आणलेल्या दंगलीशी मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही, या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाची मुले नव्हती, असे राज यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीतील घडवून आणलेल्या हिंसाचारात परप्रांतीयांचा सहभाग असल्याचेही राज यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद येथे जाळपोळीच्या घटनाही घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. तर औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास 60 कंपन्यांना आग लावण्यात आली होती. तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती. याबाबत राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता, राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना मराठा समाजातील मुलांना राज यांनी क्लीन चिट दिली. तसेच मराठा मोर्चावेळी वाळूज औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांनी तोडफोड केली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याचा अर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
या तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाचे तरुण नव्हते. मात्र मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व नसल्याने हे आंदोलन बदनाम झाल्याची खंतही राज यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून सुरू असलेल्या राजकारणावर राज यांनी प्रकाश टाकला. नाशिक महापालिकेची सत्ता माझ्याकडे असताना अडीच वर्षे पालिकेला आयुक्तपद नव्हते. राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तेथील राजकीय पक्षांनी केला. मात्र आम्ही आयुक्तांविनाही महापालिका उत्तम चालवली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. पण सेना-भाजपाच्या नगरसेवकांना कामच करायची नसतील. तर आयुक्त असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.