चौघांना चिरडणारा सलमानच होता

By admin | Published: May 7, 2014 04:00 AM2014-05-07T04:00:04+5:302014-05-07T06:38:33+5:30

चौघांचा बळी घेतलेल्या लँड क्रुझर गाडीतून अभिनेता सलमान खान चालकाच्या सीटवरून बाहेर पडला होता, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सत्र न्यायालयात दिली़

It was Salman who had squeezed the four | चौघांना चिरडणारा सलमानच होता

चौघांना चिरडणारा सलमानच होता

Next

मुंबई : वांद्रे येथील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीजवळील पदपथावर झोपलेल्या चौघांना चिरडणार्‍या लँड क्रुझर गाडीतून अभिनेता सलमान खान चालकाच्या सीटवरून बाहेर पडला होता, अशी साक्ष मंगळवारी या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सत्र न्यायालयात दिली़. घटनेच्या तब्बल १२ वर्षांनी सलमान घटनास्थळी होता याची साक्ष नोंदवण्यात आली. याने सलमानच्या अडचणी वाढू शकतात़ ही साक्ष नोंदवली जात असताना सलमान न्यायालयात हजर होता़ निळ्या रंगाची जीन्स व चंदेरी रंगाचा शर्ट घातलेला सलमान न्यायालयाचे कामकाज शांतपणे बघत होता़ त्याच्यासोबत अर्पिता व अल्वीरा ह्या बहिणीसुद्धा होत्या़ सलमान न्यायालयात आल्याने सत्र न्यायाधीश डी़ डब्लू़ देशपांडे यांच्या कोर्टात गर्दी झाली होती़ सरकारी वकील जगन्नाथ केंजरकर यांनी मनू खान, मोहंमद कालीम इक्बाल पठाण व मुस्लीम शेख या प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवली़.

दबावाखाली साक्ष दिल्या

 सलमान खान चालकाच्या सीटवरून गाडीतून उतरला होता, असे मुस्लीम शेखने दंडाधिकारी न्यायालयासमोर २००६ मध्ये दिलेल्या साक्षीत म्हटले नव्हते़ त्यामुळे पोलिसांच्या दबावाने साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत असल्याचा आरोप सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला़ मात्र आपण दंडाधिकारी न्यायालयासमोरही अशीच साक्ष दिली होती़ पण त्याची नोंद का करून घेतली नाही, हे मला माहिती नसल्याचे शेखने न्यायालयाला सांगितले़ ही घटना घडली तेव्हा तेथे जमलेल्या गर्दीने सलमानला गाडीतून उतरण्यास सांगितले़ त्या वेळी त्याच्यासोबत त्याचा पोलीस सुरक्षारक्षक होता़ तोही गाडीतून बाहेर पडला व त्याने तेथे जमलेल्या नागरिकांना समजवल्याने सलमानला तेथून पळ काढता आला, असेही त्याने साक्षीत सांगितले़ पठाणने आपण सलमानला गाडीच्या पुढील बाजूच्या उजव्या दिशेच्या दरवाजाने बाहेर पडताना पाहिल्याचे न्यायालयाला सांगितले़ खानने मात्र सलमान नेमका कोणत्या दिशेने बाहेर पडला हे सांगणे कठीण असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले़ दरम्यान, भरपूर नुकसानभरपाईचे आमिष या तिन्ही साक्षीदारांना दाखवले असून, त्यामुळेच हे साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत आहेत, असा आरोपही अ‍ॅड़ शिवदे यांनी केला़ तो साक्षीदारांनी फेटाळून लावला़ यातील इतर तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष २१ मे रोजी नोंदवणार आहे़ ही घटना २००२ मध्ये घडली़ गेल्या वर्षी न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यास परवानगी दिली़ या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने हा खटला सत्र न्यायालयात वर्ग केला़ (प्रतिनिधी)

Web Title: It was Salman who had squeezed the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.