तर होईल फाशी !
By Admin | Published: September 5, 2014 01:15 AM2014-09-05T01:15:04+5:302014-09-05T01:15:04+5:30
युग हत्याकांडातील निर्घृणता पाहता आरोपींना फासावर लटकविले जाऊ शकते, असा अंदाज विधी क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. हत्याकांडातील परिस्थितीजन्य पुरावे फाशीच्या शिक्षेचे समर्थन करणारे आहेत.
निर्घृण कृत्य : परिस्थितीजन्य पुराव्यांवर प्रकरणाची भिस्त
नागपूर : युग हत्याकांडातील निर्घृणता पाहता आरोपींना फासावर लटकविले जाऊ शकते, असा अंदाज विधी क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. हत्याकांडातील परिस्थितीजन्य पुरावे फाशीच्या शिक्षेचे समर्थन करणारे आहेत. परंतु, पोलिसांनी अन्य प्रकरणात होतात तशा चुका युग हत्याकांडातही केल्यास आरोपींना कठोर शिक्षा होणे कठीण जाईल, असे बोलले जात आहे. आरोपींविरुद्ध अद्याप दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. पोलिसांनी सध्या भादंविच्या कलम ३६३ (अपहरण), ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) व ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. कायदेतज्ज्ञांनुसार दोषारोपपत्रामध्ये भादंविच्या १२०-ब (कट रचणे) व २०१ (पुरावे नष्ट करणे) कलमाचा समावेश केला जाऊ शकतो. प्रथमदर्शनी हे प्रकरण विरळ दिसून येत आहे. आरोपी राजेश दवारे हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कार्यरत होता. त्याचा डॉ. चांडक यांच्यासोबत वाद झाला होता. युगबाबत शत्रुत्व ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. त्या चिमुकल्याला बऱ्यावाईटाचे ज्ञान नव्हते. वडिलांसोबतच्या भांडणानंतरही त्याचा राजेशवर विश्वास होता. यामुळेच क्लिनिकमध्ये बोलावल्याचे सांगितल्यावर शाळेची बॅग चौकीदारापुढे फेकून तो चटकन राजेशच्या गाडीवर बसला. आरोपी सूडाच्या भावनेने पेटलेला होता. त्याने युगचा विश्वासघात केला. युगला गाडीवर बसवून शहरापासून दूर निर्जनस्थळी नेले. या ठिकाणी युगला कुणाचीही मदत मिळू शकत नव्हती. रस्त्यात युग ओरडायला लागला असता त्याला क्लोरोफॉर्मची सुंगणी देण्यात आली. जंगलात युगची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. डोके खड्ड्यात पुरून वरून दगड ठेवण्यात आला. यानंतर आरोपी दगडावर व युगच्या अंगावर उभे झाले. ही घटना योजनाबद्ध पद्धतीने अमलात आणण्यात आली. यामुळे आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र ठरतात, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
कलमांतील शिक्षेची तरतूद
भादंविच्या कलम ३०२ मध्ये किमान जन्मठेप व कमाल फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. आरोपींनी कट रचून हत्या केल्यामुळे त्यांना कलम १२०-ब अंतर्गतही दोषी ठरविले जाऊ शकते. या दोन्ही कलमा सिद्ध झाल्यास गुन्ह्याची गंभीरता वाढते. कलम ३६४-अ मध्ये जास्तीतजास्त आजन्म कारावासाची तरतूद आहे. कलम २०१ अंतर्गत कमाल ७ वर्षांपर्यंतचा कारावास ठोठावला जाऊ शकतो. या सर्व कलमांतर्गत आरोपी दोषी ठरल्यास फाशीची शिक्षा होण्याची शक्यता वाढेल.
विधी अधिकाऱ्यांनी करावे मार्गदर्शन
पोलिसांच्या तपासात बहुतांश वेळा चुका आढळून येतात. पोलिसांना कायद्याचे सखोल ज्ञान राहात नसल्यामुळे चुका होत असतात. परिणामी अशा संवेदनशील प्रकरणात विधी अधिकाऱ्यांनी पोलिसांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. याशिवाय तपास अधिकाऱ्यानेही स्वत:हून तज्ज्ञ वकिलांशी सल्लामसलत केली पाहिजे. पोलिसांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे नियुक्त विधी अधिकाऱ्यांची चमू असते. परंतु, यात अनुभवी वकिलांची नियुक्ती करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.
जलदगती न्यायालयात चालावा खटला
जनतेचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी युग हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून एका निश्चित कालावधीत निकाल दिला गेला पाहिजे. आरोपींना अटक केल्यापासून तीन महिन्यांत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. मोठ्या शिक्षेची तरतूद असलेल्या कलमांचा समावेश असल्यामुळे हे प्रकरण नंतर सत्र न्यायालयाकडे पाठविले जाईल. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने सहा महिन्यांत निकाल जाहीर केला पाहिजे. त्यासाठी प्रकरणावर दैनंदित सुनावणी घेणे गरजेचे राहील. चांडक कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात असून त्यांना लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
ओळखपरेड महत्त्वाची: आरोपींची ओळखपरेड हा प्रकरणाला बळकटी आणणारा पुरावा असून अपहरण व खुनासारख्या अतिसंवेदनशील प्रकरणातील आरोपींची छायाचित्रे प्रसार माध्यमांनी प्रसारीत केल्यास पुढे त्याचा लाभ आरोपींना मिळून ते निर्दोष सुटतात, असे प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे म्हणाले. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, आरोपींची ओळख परेड ही कारागृहात दंडाधिकाऱ्यासमक्ष घेतली जाते. न्यायालयातील साक्षीपुराव्याच्या वेळी ओळख परेडमध्ये सहभागी होणाऱ्या साक्षीदाराची साक्ष तपासली जाते. या ठिकाणी साक्षीदाराने आरोपीला ओळखल्यास तो संबंधित प्रकरण बळकट करणारा पुरावा ठरतो. बचाव पक्षाने जर वृत्तपत्रातील प्रकाशित आरोपींच्या छायाचित्रांचा न्यायालयात खटल्याच्या सुनावणी दरम्यान वापर केल्यास ओळख परेडला शून्य अर्थ प्राप्त होतो आणि संवेदनशील प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटतात, असेही ते म्हणाले. संवेदनशील प्रकरण आणखी बळकट करण्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक आहे. अशा प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजही महत्त्वाचे ठरतात. घटनास्थळावरील पुरावे, पायाचे निशाण, वाहनाच्या टायरचे निशाण, शस्त्राने मारल्यास त्यावरील हाताचे ठसे, आरोपीच्या अंगावरील गुन्ह्याच्या वेळचे कपडे पुरावा म्हणून महत्त्वाचे असतात, मजबूत पंच साक्षीदारांनाच साक्षीदार केले जावे, असेही ते म्हणाले.