मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो आमचाच, पण...; 'मोठं मन' दाखवतानाच सेनेची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 11:37 AM2019-07-09T11:37:30+5:302019-07-09T11:47:50+5:30
मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचं भाष्य
मुंबई: लहान भाऊ, मोठा भाऊ आणि त्यावरुन सुरू झालेला मुख्यमंत्रिपदाचा वाद यावरुन शिवसेनेनं 'मन की बात' केली आहे. मुख्यमंत्री कुणाचाही झाली तरी तो आमचाच असेल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं सांगत राजकारणात 'मी'ला नाही, तर 'आम्ही'ला ताकद असल्याचं राऊत म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसं ठरलं तसंच घडेल आणि मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचं आधीच सोडवलेलं उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल, अशा शब्दांमध्ये 'सामना'मधून मुख्यमंत्रीपदावर भाष्य करण्यात आलं. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'मुख्यमंत्री भाजपाचा असेल तरी आमचा आणि शिवसेनेचा असेल तरी आमचा,' असं राऊत म्हणाले. राजकारणात 'मैं'ला नव्हे, तर 'हम'ला ताकद असते, असंदेखील त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, असं म्हणत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही कटुता नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. 'आमच्यात कुरघोडी वगैरे काही नाही. सगळं अगदी खुसखुशीत, चमचमीत आहे. समोर पंचपक्वानांचं ताट वाढलेलं असताना ते उधळण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करणार नाही. ठिणगी पडू नये, वाद होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,' असं राऊत यांनी सांगितलं. 'दोघांची सत्ता आणणं हेच ध्येय आहे. सत्तेचं समसमान वाटप यात सगळं काही येतं. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली त्याप्रमाणे सगळं होईल,' असं राऊत म्हणाले.
सामनामधून काय म्हणते शिवसेना?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसे ठरले तसेच घडेल व या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल. तोपर्यंत भाजप व शिवसेनेच्या मंडळींनी ‘युती’च्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहायचे, ‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’ युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही. रावसाहेब दानवे यांचे आभार तरी किती मानावेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?