यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:35 AM2019-11-28T06:35:04+5:302019-11-28T06:35:22+5:30

तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे.

It will not be cold this time | यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी

यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे. ‘एल निनो’सह उर्वरित घटकांचा वातावरणावर प्रभाव जाणवत असून, उष्ण वर्षांत सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यंदा भारतात हिवाळा सौम्य राहील. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, एल निनोचा प्रभाव यास कारणीभूत असेल. मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला भारतीय हवामान शास्त्र विभाग हवामानाचा सत्रनिहाय अंदाज वर्तवित असून, त्यात सुधारणा करत आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या शहरांना पुराबाबत सावध करण्यासाठीही हवामान विभाग कार्यरत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. आता आणखी एक धोरण तयार होत असून, ते महिनाभरात तयार होईल. हवामानासंदर्भातील व्यावसायिक वापरासाठीच्या उत्पादनांवरही भर दिला जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

२०१८ साली वातावरणात मोठी स्थित्यंतरे झाली. त्यामुळेच २०१८ हे वर्ष १९०१ पासून सहावे उष्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात आले आहे. यापूर्वी २०१७, २०१६, २०१५, २०१० आणि २००९ या पाच वर्षांची नोंद उष्ण वर्ष म्हणून झाली आहे. २०१८ या वर्षी देशभरात घडलेल्या आपत्कालीन घटनांमुळे तब्बल १ हजार ४२८ जणांचे बळी गेले होते. तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ तसेच उष्णतेच्या लाटांचा परिणाम म्हणूनच या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नसल्याचा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे.

२०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष

ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भरच पडत आहे. १९९८ सालापासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे आता दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.
१९९८ सालासह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची ‘उष्ण वर्ष’ म्हणून नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांचा आढावा घेतल्यास २००९, २०१० व २०१६ या तीन वर्षांत सर्वाधिक तापमान वाढ नोंदविण्यात आली होती.

जागतिक तापमान वाढीसाठी कर्ब वायूंपैकी ७० टक्के कारणीभूत असणारा वायू म्हणजे कार्बन डायआॅक्साईड. दुसरा मिथेन आणि तिसरा नायट्रस आॅक्साइड.

उस्मानाबाद येथे सर्वांत कमी किमान तापमान
राज्यात सर्वांत कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १२.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

Web Title: It will not be cold this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.