चंद्रकांत पाटलांना पीएचडीसाठी किती वर्ष लागतील?; दस्तुरखुद्द पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:08 AM2020-02-24T03:08:14+5:302020-02-24T06:54:10+5:30
शरद पवार यांचा पाटील यांना टोला
मुंबई : साधारणत: पीएचडी करायला दोन ते तीन वर्षे लागतात. पण, चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायची असेल तर दहा-बारा वर्षांचा वेळ काढावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात रविवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात खा. पवार यांनी तरुणाईला चांगलेच धडे दिले.
ते म्हणाले, माझे वय ऐंशी वर्षे झाले असले तरी विचार आणि कृतीने अजुनही तरुण आहे. मी वयाच्या २६ व्या वर्षी विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेलो. लोकशाहीत प्रतिनिधी निवडायचा अधिकार लोकांकडे असतो. काही लोक चुकीचे पद्धतीने निवडून येत आहेत. लोकांनी जागरूक राहून अशा मंडळींना खड्यासारखे बाजूला सारायला हवे. विद्यार्थ्यांनाही आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळायला हवा. त्यासाठी सरकारने निवडणुका सुरू कराव्यात, अशी सूचनाही पवार यांनी केली.
ते म्हणाले, कुशल मनुष्यबळ नसल्याची तक्रार उद्योजक करतात. तर, नोकऱ्या नसल्याची युवकांची ओरड असते. ही दरी भरावी लागेल. उच्च शिक्षण विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याची आवश्यकता आहे.