शहीद जवानांच्या नावाने मोदींनी मत मागणे चुकीचेच : विक्रम गोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 07:05 PM2019-05-06T19:05:44+5:302019-05-06T19:07:41+5:30
जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये.
पुणे : मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. मी केवळ जवान आणि शेतक-यांशी बांधील आहे, अशी स्पष्टोक्ती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या नावाने मत मागणे चुकीचेच आहे, अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मोदींना कानपिचकी मारली. तर दुसरीकडे दुष्काळाचे खापर सत्ताधा-यांवरफोडणे हे देखील चुकीचे आहे असा टोला विरोधकांना लगावत सरकारची पाठराखण केली.
विक्रम गोखले अॅक्टिंग व अॅकडमी आणि एचआर झूम यांच्यातर्फे १९ मे रोजी अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे विक्रम गोखले अभिनय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोखले बोलत होते.
गोखले म्हणाले, जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये. हवामानातील बदल काही सत्ताधा-यांनी सांगितले म्हणून होत नाहीत. त्यामुळे उष्माघात, दुष्काळ आणि पूर अशा संकटांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार कसे? प्रत्येक गोष्टीमध्ये सत्ताधा-वर खापर फोडणे चुकीचे आहे.
राजकारणातील अभिनेत्यांच्या सहभागाविषयी विचारले असता ते पुढे म्हणाले, अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्ती राजकारणात यशस्वी होतील याची शाश्वती नसते. आमचे बच्चन साहेब राजकारणात गेले. नंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप झाला.आमच्या पक्षात या म्हणून अनेकवेळा मलाही आग्रह झाला. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाशी मी बांधील नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र असल्यामुळे मी कोणत्याच पक्षामध्ये दाखल झालो नाही. मात्र, चांगला राजकीय पुढारी होण्यासाठी योग्य अभ्यास असणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या राजकारणाचा व्यवसाय झाला आहे. भाऊ, दादा, साहेब अशी बिरुदं लावून ज्यांच्यामागे आपण धावतो त्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की रणांगणात जाण्याची वेळ येते तेव्हा नेते घरी असतात आणि लाठया-काठया मुलांना खाव्या लागतात.
..................................