सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:19 PM2019-12-17T12:19:02+5:302019-12-17T12:19:24+5:30
भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार राडेबाजी पाहायला मिळाली. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनतर याप्रकरणी आता राजकीय प्रतिकिया समोर येत आहे.
भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सत्ता नसल्यानं भाजप आमदारांची तडफड होत आहे. सभागृहात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली असल्याचंही, जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. ते नागपूरमधील सभागृहाच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते.
नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस सुरु असून या अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांमध्ये सभागृहातचं हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) देखील भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर काही वेळ वादळी चर्चा रंगल्यानंतर सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आले होते. त्यातच आज थेट आमदारांमध्येच हाणामारी झाल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडला आहे.