आता ‘कौशल्य’पूर्ण रंगात रंगणार आयटीआयच्या इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:37+5:302020-02-12T06:00:40+5:30
ग्रीन मिशन : सबलीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत
सीमा महांगडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील आयटीआयच्या इमारतींच्या भिंती लवकरच ‘कौशल्य बलम’ या कौशल्य विकास विभागाच्या बोधचिन्हाच्या रंगसंगतीप्रमाणे रंगलेल्या दिसणार आहेत. हरित औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहिमेच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून राज्यातील आयटीआयच्या तांत्रिक शाळा, इमारती, कार्यालये यांच्यासाठी एकच रंगप्रणाली ठरविली आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तांत्रिक शाळा, कार्यालयांच्या इमारती यांमध्ये हरित औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहीम राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व आयटीआय संस्था आणि त्यांच्या कार्यालयीन इमारतींत पर्यावरणपूरक उपक्रम, सौरऊर्जेवर आधारित कार्यक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. इमारतींच्या कमानीच्या प्रवेशद्वाराची रचना ही त्यावर विभागाचे कौशल्य बलम हे बोधचिन्ह ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने करावी, अशा सूचना आहेत. इमारतींत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवायचे आहेत. ग्रीन आयटीआय मिशनचा हा महत्त्वपूर्ण भाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयटीआय संस्थांना या मोहिमेसाठी फेब्रुवारी २०२० हा महिना देण्यात आला असून या दरम्यान संस्थांचे, इमारतींचे, कार्यालयांचे परिरक्षण, दुरुस्ती करावी लागेल. वेळोवेळी इमारत दुरुस्ती, सुरक्षेचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा, अशा सूचनाही विभागाने केल्या आहेत.
ग्रीन आयटीआय संकल्पनेसाठी याआधीच कौशल्य विकास विभागामार्फत केआरए निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्या पूर्तता, अंलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत आपण घेत आहोत. विद्यार्थ्यांना बाहेरून अनुभव मिळण्यापेक्षा संस्थेतच अनुभव मिळेल आणि केआरएही पूर्ण होतील हा यामागील उद्देश आहे.
- सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव,
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य
५विद्यार्थ्यांना मिळणार कामाचे प्रात्यक्षिक शिक्षण
शासकीय औद्योगिक संस्थांनी आयटीआय इमारती, संस्था, कार्यालयांमध्ये देखभाल करताना स्वत:च्याच मनुष्यबळाचा वापर करायचा आहे. वसतिगृह देखभालीबाबतही आवश्यक कार्यवाहीचे निर्देश विभागाने दिले. कौशल्य विकास विभागाच्या या ग्रीन मिशनमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचाच वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांना संस्थेअंतर्गतच प्रशिक्षण मिळावे यासाठी संस्थांमधील नादुरुस्त खिडक्या, विद्युत यंत्रणा इत्यादीची किरकोळ दुरुस्ती संस्थेतील प्रशिक्षणार्थींकडून करून घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.