राज्यातील आयटीआयच्या सात हजार जागा वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 08:58 PM2019-08-13T20:58:50+5:302019-08-13T21:02:38+5:30
राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकुण प्रवेश क्षमता जवळापास दीड लाखांवर पोहचली आहे.
पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश क्षमतेत सात हजार जागांची भर पडली आहे. त्यामुळे एकुण प्रवेश क्षमता जवळापास दीड लाखांवर पोहचली आहे. प्रामुख्याने खासगी संस्थांमधील जागांमध्ये ही वाढ झाली आहे. दरम्यान, या जागांवरील प्रवेशासह महापुरामुळे प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) प्रवेशासाठीची मुदत वाढविली आहे. तसेच नव्याने जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीचा समावेश प्रक्रियेत करण्यात आला आहे.
राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे १ लाख ४२ हजार जागा भरल्या जाणार आहे. तिसºया फेरीअखेरपर्यंत जवळपास ७० हजार जागांवर प्रवेश झाले आहेत. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील ४४ नवीन खासगी आयटीआयला मान्यता दिली आहे. तसेच ४५ नवीन तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रवेश क्षमता सुमारे ७ हजार २०० ने वाढली आहे. चौथी फेरी दि. १३ गस्ट रोजी संपणार होती. मात्र, राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे नवीन जागा व चौथ्या फेरीत उर्वरीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती '' डीव्हीईटी'' चे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.
सुधारित वेळापत्रकानुसार चौथी फेरी व समुपदेश फेरीतील प्रवेशासाठी दि. १६ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया दि. १३ ऑगस्ट रोजी संपणार होती. तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरीय समुपदेश फेरी घेतली जाणार आहे. या फेरीमध्ये संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. या फेरीनंतर शासकीय व खासगी संस्थांमधील संस्थास्तरीय जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
--------------
आयटीआय प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक -
चौथी प्रवेश फेरी -
दि. १६ ऑगस्टपर्यंत - चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत मुळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेश घेणे
दि. १६ ऑगस्टपर्यंत - समुपदेशन फेरीसाठी मुदतीत अर्ज न करू शकलेल्या उमेदवारांनी नव्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे
दि. १७ ऑगस्ट - समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी - राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षम संस्थांमधील चौथ्या फेरीच्या समाप्तीनंतर रिक्त राहिलेल्या जागा या फेरीत उपलब्ध असतील.
दि. १७ ऑगस्ट - रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणे
दि. १९ ऑगस्ट - इच्छुकांनी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत हजर राहून या फेरीसाठी हजेरी नोंदविणे. त्यातून गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
दि. २० ते २३ ऑगस्ट - गुणवत्ता क्रमांकानुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप व प्रत्यक्ष प्रवेश.
शासकीय संस्थांची संस्थास्तरीय समुपदेश फेरी -
दि. २४ ऑगस्ट - जिल्हास्तरीय फेरीनंतर रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणे
दि. २६ ऑगस्ट - संस्थेत प्रत्यक्ष हजेरी नोंदविणे, गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
दि. २७ व २८ ऑगस्ट - गुणवत्ता यादीनुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप व प्रत्यक्ष प्रवेश
खासगी संस्थास्तरावरील प्रवेश -
दि. १३ सप्टेंबरपर्यंत - संस्थास्तरावरील २० टक्के जागा व जिल्हा फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया