‘आयटीआय’ संस्था विकास शुल्क रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2015 02:12 AM2015-11-14T02:12:24+5:302015-11-14T02:12:24+5:30
विद्यार्थ्यांना संस्था विकास शुल्काचे १ हजार रुपये परत मिळणार.
प्रवीण खेते / अकोला : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) प्रवेशादरम्यान आकारण्यात आलेले संस्था विकास शुल्क रद्द करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना संस्था विकास शुल्काचे १ हजार रुपये परत मिळणार आहेत. विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेले अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय दिवाळीच्या मुहूर्तावर घेण्यात आल्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूश खबर ठरली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे तब्बल ३५ वर्षांनंतर आयटीआयच्या प्रवेश शुल्कात प्रथमच वाढ करून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शुल्क लादण्यात आले होते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांवर प्रवेशावेळी ५00 रुपये प्रशिक्षण शुल्क, १00 रुपये ग्रंथालय शुल्क, १ हजार रुपये वसतिगृह शुल्क, अशी एकूण १६00 रुपये अनामत रक्कम भरावी लागली होती. या व्यतिरिक्त १ हजार रुपये संस्था विकास शुल्क, १00 रुपये इंटरनेट सुविधा शुल्क, तर १00 रुपये सांस्कृतिक कार्यक्रम शुल्काचा भारही विद्यार्थ्यांवर टाकण्यात आला होता. परिणामी प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालकांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले होते. मध्यंतरी अनेक संघटनांनी विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेले अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आयटीआय प्रवेश शुल्कातील अतिरिक्त संस्था विकास शुल्क रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना संस्था विकास शुल्काचे १ हजार रुपये परत मिळणार आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आकारण्यात आलेल्या संस्था विकास शुल्काची रक्कम परत करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. या संदर्भात पुढील निर्देश आल्यावर विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे अकोला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एस.पी. झोडपे यांनी स्पष्ट केले. खासगी आयटीआयचे विद्यार्थी वंचित प्रवेशादरम्यान आकारण्यात आलेले संस्था विकास शुल्क केवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रद्द करण्यात आला आहे. परंतु, या संदर्भात खासगी आयटीआय बाबत स्पष्ट निर्देशित करण्यात आले नसल्याने, या विद्यार्थ्यांंना संस्था विकास शुल्क कायम असल्याचे समजते. त्यामुळे संस्था विकास शुल्काची रक्कम केवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनाच परत मिळणार आहे.