आयटीआयच्या प्रवेश शुल्कात कपात
By admin | Published: November 15, 2015 02:08 AM2015-11-15T02:08:47+5:302015-11-15T02:08:47+5:30
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केल्याने सर्वच स्तरातून त्याला विरोध झाला
मुंबई : राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केल्याने सर्वच स्तरातून त्याला विरोध झाला. या विरोधानंतर अखेर शासनाने आयटीआयच्या प्रवेश शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले संस्था विकास शुल्कही परत येण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी आॅगस्ट २0१५ या शैक्षणिक सत्रापासून होणाऱ्या प्रवेशासाठी शुल्क वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाविरोधात स्टुटुंट फेडरेशन आॅफ इंडिया आणि आयटीआयचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. याची दखल घेत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अध्यादेश काढून शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था विकास शुल्काच्या नावाखाली घेण्यात येणारे एक हजार रुपयांचे शुल्क रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले एक हजार रुपयांचे संस्था विकास शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले संस्था विकास शुल्क तातडीने परत करण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (प्रशिक्षण) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात संस्था विकास शुल्क दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.