आयटीआय नवीन इमारतीत सुरू
By admin | Published: June 11, 2016 03:28 AM2016-06-11T03:28:48+5:302016-06-11T03:28:48+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काम पाच वर्षांपासून चालू असून दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे उद्घाटन झाले होते.
तळा : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काम पाच वर्षांपासून चालू असून दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे उद्घाटन झाले होते. तरीदेखील या इमारतीत कार्यालय सुरू झाले नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने उर्वरित कामे पूर्ण करून औद्योगिक प्रशिक्षण संस्था या जागेत सुरू करण्यात आली आहे.
गेली काही वर्षे ही संस्था अपुऱ्या जागेत कार्यरत होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवीन जागेत सुरु झाल्याने निसर्गरम्य आणि प्रशस्त सर्व सुविधायुक्त नवीन इमारतीत अध्ययन करण्यास आम्हास आनंद वाटेल, असेही प्राचार्य चंद्रकांत पडलकर यांनी सांगितले. या ठिकाणी जिल्ह्यातील जवळपास १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जागेअभावी मेकॅनिक मेंटेनन्स केमिकल प्लांट (एमएमसीपी), आॅपरेटर केमिकल प्लांट (एओसीपी) आणि मोटार मॅकेनिक यासारखे कोर्स प्रस्तावित आहेत. हे प्रस्ताव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवून, शासनाने लवकर मान्यता दिली, तर हे देखील कोर्स सुरू करता येतील, असे प्राचार्य चंद्रकांत पडलकर म्हणाले. यासाठी ६० टक्के मटेरियल खरेदी झाले असून उर्वरित मटेरियल वरिष्ठ अधिकारी जागेची पाहणी करून योग्य जागा वाटल्यास खरेदी करता येईल, असे पडलकर यांनी सांगितले.
या ठिकाणी प्राचार्य १, फिटर १, वायरमन १, गट निर्देशक १ अशी चार पदे रिक्त असून त्यांचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवून दिला आहे. (वार्ताहर)
विद्यार्थी समाधानी
सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता ए. एन. कटकमवार आणि ए. एम. पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या जागेत काम केले. डोंगरदरीसारखा सखल जागेचा परिसर आणि अनेक अडचणींवर मात करून ठेकेदारांकडून हे काम करून घेतले आहे. आयटीआयचे विद्यार्थी अक्षय राऊत आणि हर्षद गोविलकर यांनी प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केले.