Maratha Reservation: आरक्षणाचा अहवाल आधीसारखाच; त्यामुळे हा माझाच विजय- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 04:22 PM2018-11-29T16:22:08+5:302018-11-29T16:24:48+5:30
आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू
सावंतवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता याचं श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली आहे. आघाडी सरकारनं आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र ते न्यायालयात टिकू शकलं नाही. मात्र आता मागीसवर्गीय अहवालानं दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचं राणेंनी म्हटलं.
आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झालं. याबद्दल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. 'आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन,' असं राणे यांनी म्हटलं. यापुढे बोलताना त्यांनी आघाडी सरकारच्या घडामोडींची आठवण करुन दिली. 'मराठा समाजाला मागास आहे की नाही, याबद्दलचा अहवाल मागासवर्गीय आयोगानं दिला. या आयोगाच्या अहवालानं मराठा समाजाला आरक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा अहवाल आणि आघाडी सरकारच्या काळात मी दिलेला अहवाल सारखाच आहे. त्यामुळे हा माझा विजय आहे,' असा दावा त्यांनी केला.
बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभ पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजुरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.