अपहरण नव्हे ‘ते’ तर प्रेम प्रकरण
By admin | Published: July 2, 2016 02:38 AM2016-07-02T02:38:02+5:302016-07-02T02:38:02+5:30
सोशल मीडियाचा गैरवापर डोक्याला नाहक ताप देणारा कसा ठरू शकतो, याची प्रचिती नुकतीच मालाड पोलिसांना आली.
मुंबई : सोशल मीडियाचा गैरवापर डोक्याला नाहक ताप देणारा कसा ठरू शकतो, याची प्रचिती नुकतीच मालाड पोलिसांना आली. कोणतेही तथ्य न तपासता तरुणीचे अपहरण झाल्याचे सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. मात्र या संपूर्ण प्रकरणात तपासाअंती काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले. तथापि, यामुळे व्हिडीओत असलेल्या जोडप्याला आणि मालाड पोलिसांना या प्रकरणी प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.
गेले आठ दिवस सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओत एका तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ मालाड पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी या प्रकरणी तातडीने कसून चौकशी सुरू केली. तीन दिवसांनंतर व्हिडीओतील कार पोलिसांनी शोधून काढली. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुलाची ती कार होती. व्हिडीओतील ती मुलगी ही त्याची प्रेयसी असून तिचे अपहरण झालेले नसल्याचे उघड झाले. मात्र मोबाइलमध्ये कुणी तरी शूट करून हा व्हिडीओ अपहरणाचा व्हिडीओ भासवून व्हायरल करण्यात आला. खरे म्हणजे एखाद्या जागरूक नागरिकाने व्हिडीओ व्हायरल न करता तो आधी पोलिसांकडे सोपवला असता. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन खातरजमा केली असती. पण सोशल मीडियामुळे या जोडप्यासह पोलिसांचीही तीन दिवस झोप उडाली होती.
२२ जून रोजी हा व्हिडीओ व्हायरल होताच, मालाड पोलिसांनी वेळ न दवडता ‘घटना अहवाल’ तयार केला. चौकशीत संबंधित मुलीशी मैत्री असल्याचे समोर आले. भांडणाच्या रागात ती मुलगी गाडीत बसण्यास नकार देत होती आणि हेच सर्व एका स्थानिकाने रेकॉर्ड केले. या प्रकरणी संबंधित मुलीनेदेखील जबाब देत हे आमचे खासगी प्रकरण असल्याचे म्हटले आहे. ही घटना जेथे घडली त्या ठिकाणी वर्दळ होती. त्यामुळे निदान अशा ठिकाणी तरी अपहरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>मालाड पोलिसांनी तयार केला ‘घटना अहवाल’
२२ जून रोजी हा व्हिडीओ व्हायरल होताच, मालाड पोलिसांनी वेळ न दवडता ‘घटना अहवाल’ तयार केला. तीन दिवस कसून शोध घेत मालाड पोलिसांच्या टीमने संबंधित गाडी शोधून काढत त्या मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत संबंधित मुलीशी मैत्री असल्याचे समोर आले. काहीशा कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते, त्याच रागात ती मुलगी गाडीत बसण्यास नकार देत होती आणि हेच सर्व एका स्थानिकाने रेकॉर्ड केले. या प्रकरणी संबंधित मुलीनेदेखील जबाब देत हे आमचे खासगी प्रकरण असल्याचे म्हटले आहे.