चित्रपटक्षेत्राशी संबंधित नसतानाही आॅस्कर पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अविस्मरणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 06:09 PM2018-02-16T18:09:07+5:302018-02-16T18:09:29+5:30
चित्रपटक्षेत्राशी थेट संबंध नसतानाही चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत तंत्रज्ञानातील योगदानाकरिता आॅस्कर पुरस्कार मिळाला, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या वेगळ्या कामावर लक्ष्य केंद्रित केले असून, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, फायर ब्रिगेड, अँम्बुलन्स यांच्याकरिता ‘रेडिओ रिपिटर’ प्रोजेक्ट हाती घेतले आहे.
पुणे - चित्रपटक्षेत्राशी थेट संबंध नसतानाही चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत तंत्रज्ञानातील योगदानाकरिता आॅस्कर पुरस्कार मिळाला, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या वेगळ्या कामावर लक्ष्य केंद्रित केले असून, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, फायर ब्रिगेड, अँम्बुलन्स यांच्याकरिता ‘रेडिओ रिपिटर’ प्रोजेक्ट हाती घेतले आहे. मोबाईलवर रेडिओ कार्यान्वित करण्यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित करीत आहे. भविष्यात संधी मिळाल्यास पुन्हा चित्रपटनिर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला आवडेल अशी भावना हवाई छायाचित्रण क्षेत्रातील संशोधनासाठी आॅस्करच्या तंत्रज्ञान पुरस्कारावर आपली मोहोर उमटविलेल्या विकास साठ्ये यांनी
व्यक्त केली.
अरभाट फिल्मस आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने साठ्ये यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक
उमेश कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुंबईत शालेय शिक्षण आणि पुण्याच्या विश्वकर्मा टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे अभियांत्रिकीचे शिक्षण
घेतलेल्या साठ्ये यांनी कमिन्स येथे प्राध्यापकाची नोकरी करतानाच एम.टेक पूर्ण केले. आपल्या उच्चशिक्षणाचा उपयोग संशोधन क्षेत्रासाठी व्हावा
म्हणून त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या क्वीनहाऊसमधील एरिअल फिल्मिंग प्रॉडकशनसाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
जॉन कॉयल, ब्रँड बुकहँम आणि विकास साठे या टीमने ‘एरिअल माऊंट’ ही प्रणाली विकसित केली. या प्रणालीविषयी सांगताना विकास साठ्ये म्हणाले,
शॉटओव्हर कँमेरा सिस्टम एक असा कँमेरा माऊंट आहे जो हवाई चित्रीकरणात वापरला जातो. कँमेरा माऊंट हेलिकॉप्टरच्या पायथ्याशी जोडला जातो. जो कँमेरा आणि लेन्स सांभाळतो. माऊंटचे प्राथमिक कार्य कँमेरा पर्यंत पोहोचणारे कंपन दूर करणे आणि स्थिर फुटेज प्राप्त करणे आहे. हेलिकॉप्टरच्या खाली लावलेल्या माऊंटद्वारे चित्रीकरण जास्तीत जास्त स्थिर कसे ठेवता येईल हे आमच्यासमोरचे मोठे आव्हान होते. त्यात आम्ही यशस्वी झालो. आम्ही तयार केलेला हा एरिअल माऊंट हा आॅस्कर नामांकनासाठी पाठविला. त्यांचा प्रतिसाद आला. स्काईपवर आमची मुलाखत झाली आणि त्यानंतर तुम्हाला पुरस्कार देत असल्याचा मेल आहे.
10 फेब्रुवारीचा क्षण उजाडला. सारे काही स्वप्नवत वाटत होते. पुन्हा पाच वर्षांनी आम्ही चौघे भेटलो. हा दिवस कधीच विसरू शकत नाही. चित्रपटासाठी हवाई चित्रीकरण करणे ही खूप खर्चिक बाब आहे. त्यासाठी गुंतवणूक असायला हवी. ज्या औद्योगिक कंपन्यांकडे पैसे आहेत त्यांनी इच्छाशक्ती दाखविली तर आम्हाला नक्कीच संधी मिळू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले. परदेशातील कामाच्या पद्धतीबददल बोलताना ते पुढे म्हणाले, प्रत्येक वेळी
तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स सिद्ध करावा लागतो. कामाचे रिझल्ट दाखवावे लागतात. ते दाखविले नाही तर तुम्हाला ‘गुडबाय’ केले जाऊ शकते. स्पर्धेत
टिकून राहाण्यासाठी स्वत:चे ज्ञान अद्ययावत करणे हाच एकमेव पर्याय आहे. शिक्षण देशात घ्या किंवा परदेशात घ्या, पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रँक्टीकल
गोष्टींवर भर दिला पाहिजे. वेगवेगळे प्रयोग करीत राहिले पाहिजे. स्वत:च्या कामावर स्वत:चा विश्वास असला पाहिजे.