जे. जे.तील संपामागे षड्यंत्र!
By admin | Published: April 6, 2016 05:02 AM2016-04-06T05:02:45+5:302016-04-06T05:02:45+5:30
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे तीव्र पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले
मुंबई : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे तीव्र पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले. या संपामागे फार मोठे षडयंत्र असून, केवळ लहाने यांना अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या संपामागे सत्ताधारी पक्षातीलच एका मंत्र्यांची फूस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. यावर उपसभापती वसंत डावखरे यांनी लहाने यांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा करावी आणि संप तातडीने मिटविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे निर्देश सरकारला दिले.
हा संप सुुरू होण्यामागे काहीतरी षड्यंत्र आहे. लहाने यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लहाने यांच्या काळात जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ५ लाखांवरून ९ लाखांवर गेली, तर शस्त्रक्रियांची संख्या १९ लाखांवरून ४० लाखांवर गेली. देशभरातील सरकारी रुग्णालयांच्या क्रमवारीतही जे. जे. रुग्णालय १९ क्रमांकावरून ५व्या क्रमांकावर आले आहे. डॉ. लहानेंच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात हे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
त्यांच्या या मुद्द्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. स्थगन प्रस्ताव नाकारला असला, तरी मंत्री महोदयांना उत्तर देण्याचा आग्रह धरल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडली. ‘डॉ. लहानेंच्या बाबतीत माझ्याही भावना इतर सदस्यांप्रमाणेच आहेत. या प्रकरणी मार्डच्या सदस्यांशी चर्चा करू आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल. डॉ. लहानेंच्या विरोधात दरवर्षी येणाऱ्या तक्रारींची शहानिशा, चौकशी करू म्हणजे एकदाचे दूध का दूध आणि पानी का पानी होईल,’ असे तावडे म्हणाले. तावडे यांच्या उत्तरावर विरोधकांनी हरकत घेतली.
लहानेंची चौकशी करण्यासारखा त्यांनी कोणता गुन्हा केला आहे, असा सवाल विरोधकांनी केला, तर चौकशी हा शब्द न वापरता या प्रकरणी माहिती घेण्यात येईल, असे म्हणण्याचा आग्रह सुनील तटकरे यांनी धरला. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही ही चौकशी करण्याआधी हा संप तातडीने मिटवा आणि रुग्णांचे हाल थांबवा व त्या दृष्टीने कारवाई करा, अशी मागणी केली.