जे. डे हत्या प्रकरण: राजन टोळीविरूद्ध आरोप निश्चिती
By admin | Published: June 9, 2015 04:29 AM2015-06-09T04:29:03+5:302015-06-09T04:29:03+5:30
पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज विशेष मोक्का न्यायालयाने दहाजणांविरोधात आरोप निश्चित केले.
मुंबई : पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज विशेष मोक्का न्यायालयाने दहाजणांविरोधात आरोप निश्चित केले. त्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीच्या गँगस्टरसोबत महिला पत्रकाराचाही सहभाग आहे. आरोपींविरोधात छोटा राजनच्या संघटीत टोळीचे सदस्य आहेत, त्यांनी राजनच्या इशाऱ्यावरून डे यांची कट रचून हत्या केली आणि पुरावे नष्ट केले, या आरोपांनुसार खटला चालणार आहे.
११ जून २०११ रोजी पवई परिसरात डे यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणी राजन टोळीचा गँगस्टर सतीश तंगप्पन जोसेफ उर्फ सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरूण डाके, सचीन गायकवाड, अनील वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश आगावणे, विनोद असरानी उर्फ विनोद चेंबुर, पॉल्सन जोसेफ, दिपक सिसोदीया आणि जीग्ना व्होरा यांना अटक केली. यापैकी जोसेफने डे यांच्यावर गोळया झाडल्या. विनोदने सतीशला डेची ओळख पटवून दिली. व्होराने छोटा राजनला डे यांचे तपशील पुरवले. सिसोदीयाने शस्त्रे गोळा केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली. छोटा राजन आणि नारायण बीश्त या दोघांना फरार आरोपी ठरविण्यात आले. तर विनोदचा आजारपणात मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधातील आरोपांची निश्चिती करण्यात आली नाही.
डे आपल्याविरोधात बातम्या देतात, प्रतिस्पर्धी डी कंपनीशी त्यांचे चांगले संबंध आहेत, आपले तपशील डी कंपनीला देऊ शकतात असा संशय राजनला होता. त्यामुळे राजनने डे यांची हत्या करण्याचे ठरविले होते.