जे. डेच्या पत्नीने न्यायालयात दिली साक्ष
By admin | Published: November 8, 2016 05:01 AM2016-11-08T05:01:55+5:302016-11-08T05:01:55+5:30
ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी शुभा डे यांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात साक्ष दिली. डे यांची हत्या होण्यापूर्वी या खटल्यातील आरोपी विनोद
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी शुभा डे यांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात साक्ष दिली. डे यांची हत्या होण्यापूर्वी या खटल्यातील आरोपी विनोद चेंबुर डे यांना कॉल करायचा. तर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल महाबोले यांनी डे यांना धमकावल्याचेही शुभा यांनी विशेष न्यायालयाला सांगितले.
पत्रकार अकेला याचे समर्थन करणारा लेख डे यांनी लिहील्याने सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल महाबोले यांंनी डे यांना धमकावले होते. भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत महाबोले यांनी डे यांना धमकी दिली होती, अशी साक्ष शुभा डे यांनी न्यायालयात दिली.
‘२८ एप्रिल ते ५ मे २०११ या कालावधीत डे युरोप ट्रिपला गेले होते. या ट्रिपदरम्यान माझ्याशी संपर्क साधता यावा, यासाठी डे यांनी आंतरराष्ट्रीय सिम घेतले होते. लंडन, पॅरिस, जर्मनी आणि हॉलंड इत्यादी ठिकाणे ते फिरले. ट्रिपवरून घरी आल्यावर ते मला नेहमीप्रमाणेच वाटले. मात्र ३० मे रोजी माझ्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आक्सा बीचला गेलो होतो, तेव्हा डे तणावात वावरत असल्याचे मला वाटले,’ अशी साक्ष शुभा यांनी दिली.
मृत्यूच्या दिवशी सकाळीच डे त्यांच्या आईला भेटायला घाटकोपरला गेले. त्यानंतर ते घरी परत आलेच नाही. डे यांच्याच मित्राने त्यांची हत्या केल्याचे समजल्यावर शुभा यांनी डे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्या रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
११ जून २०११ रोजी डे यांना त्यांच्या राहत्या घराच्या बाहेरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सतीश कालीया, अभिजीत शिंदे, अरुण ढाके, सचिन गायकवाड, अलि वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश आगवणे, विनोद असरानी उर्फ विनोद चेंबुर, पॉल्सन जोसेफ आणि दीपक सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र तर पत्रकार जिग्ना वोरा हिच्यावर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. छोटा राजनला डे यांची हत्याकरण्यासाठी चिथवल्याचा आरोप वोरावर ठेवण्यात आला आहे. तर ३१ आॅगस्ट रोजी विशेष न्यायालयाने छोटा राजनवरील आरोप निश्चित केले. (प्रतिनिधी)