जे. जे. रुग्णालयातील तंत्र ठरले जगात सर्वाेत्तम

By admin | Published: April 16, 2016 03:02 AM2016-04-16T03:02:45+5:302016-04-16T03:02:45+5:30

अत्यंत गुंतागुंतीचा असलेला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजारावर जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाने वेगळ््या पद्धतीने केलेल्या ‘एन्डोस्कोपीक शस्त्रक्रियेच्या

J. J. The technique of the hospital was the best in the world | जे. जे. रुग्णालयातील तंत्र ठरले जगात सर्वाेत्तम

जे. जे. रुग्णालयातील तंत्र ठरले जगात सर्वाेत्तम

Next

मुंबई : अत्यंत गुंतागुंतीचा असलेला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजारावर जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाने वेगळ््या पद्धतीने केलेल्या ‘एन्डोस्कोपीक शस्त्रक्रियेच्या तंत्रा’ला जगातील सर्वोत्कृष्ट शस्त्रक्रियेचा सन्मान मिळाला आहे. ‘सोसायटी आॅफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टायनल अ‍ॅण्ड एंडोस्कोपीक सर्जन्स’च्या (सेजस) एन्डोस्कोपिक सर्जनच्या परिषदेत सादर केलेल्या या शस्त्रक्रियेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि दोन हजार डॉलरचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात बिहारच्या भागलपूर येथील बंबमकुमार मंडल या २७ वर्षीय तरुणाला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी या तरुणाला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजार झाल्याचे निदान करण्यात आले. या तरुणाच्या छातीच्या पिंजऱ्यात पोटातील आतडी, प्लिहा, स्वादुपिंड अडकले होते. या आजारामुळे त्याचे हृदय छातीच्या उजव्या बाजूला सरकले होते. तर फुफ्फुस दबले जाऊन काळेनिळे पडले होते. त्यामुळे या तरुणाचा जीव धोक्यात होता.
जे.जे.रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. अजय भंडारवार आणि त्यांच्या टीमने रुग्णाच्या पोटाला चार व छातीच्या डाव्या भागाला तीन छिद्र पाडून (की होल सर्जरी) लेप्रस्कोपिक व थोरॉस्कोपी केली. तीन तासांच्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची आतडी, प्लिहा, स्वादुपिंड पोटात मूळ जागी बसवले. आणि अत्यंत कौशल्याने फुफ्फुसही जागी बसवण्यात आले होते. ‘जेजे’त झालेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जगातील दुसरी शस्त्रक्रिया ठरली आहे.
जे. जे. रुग्णालयाचे डॉ. अजय भंडारवार, डॉ. सौरभ गांधी, डॉ. चिंतन पटेल, डॉ. अमोल वाघ, डॉ. प्रवीण तुंगेरवार आणि डॉ. समर्थ अग्रवाल या टीमने बोस्टनमधील मॅसेच्युसेट शहरातील ‘सेजस’च्या परिषदेत याचे सादरीकरण केले.
पुरस्कार जाहीर झाल्यावर एका प्रशस्त हॉलमध्ये या टीमला मध्यभागी बसवले होते. चारही बाजूला बसलेल्या जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी टाळ्यांचा कडकडाट करीत मुंबईतील या डॉक्टरांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. (प्रतिनिधी)

हजारो शस्त्रक्रियांंतून ठरली ‘जे.जे.’तील शस्त्रक्रिया अव्वल
जे. जे. च्या शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने ‘सेजस’ या जागतिक पातळीवर गॅस्ट्रोइंटेस्टाइन आणि एंडोस्कोपिक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सोसायटीकडे या शस्त्रक्रियेचा व्हिडीओ सादर केला. या सोसायटीकडे जगभरातून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचे दीड हजारांहून अधिक नामांकने आली होती.
परिक्षकांनी त्यातून सुमारे १०० श्सत्रक्रियांची निवड केली. त्यातून अखेरीस अमेरिकेतील सात, सिंगापूरमधील एक आणि जे. जे. रुग्णालयाच्या एक अशा नऊ शस्त्रक्रियांची निवड केली. परिक्षकांनी या नऊ शस्त्रक्रियांमधून जे.जे.रुग्णालयाच्या या शस्त्रक्रियेच्या तंत्राची पहिल्या क्रमांकावर निवड झाली.

रक्कम सर्जरी विभागासाठी
दोन हजार डॉलरच्या या पुरस्काराच्या रक्कमेतून सर्जरी विभागात हाय डेफिनेशन रेकॉर्डिंग व्हिडीओ सिस्टिम विकत घेणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: J. J. The technique of the hospital was the best in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.