जे. डे दाऊदला माहिती पुरवत असल्याचा छोटा राजनला संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2016 03:23 AM2016-08-14T03:23:09+5:302016-08-14T03:23:09+5:30
वरिष्ठ पत्रकार जे. डे कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमला सर्व माहिती देऊन आपली हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे, असा दाट संशय छोटा राजनला होता आणि या संशयातूनच छोटा
मुंबई : वरिष्ठ पत्रकार जे. डे कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमला सर्व माहिती देऊन आपली हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे, असा दाट संशय छोटा राजनला होता आणि या संशयातूनच छोटा राजनने डे यांची हत्या केली. मात्र डे यांच्या मृत्यूनंतर वास्तविकता समजल्यावर छोटा राजनला त्याच्या निर्णयावर पश्चाताप झाला, असे सीबीआयने डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे.
सीबीआयने काहीच दिवसांपूर्वी छोटा राजनवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात सीबीआयने काही पत्रकारांचे जबाब नोंदवले आहेत. छोटा राजनने संबंधित पत्रकारांना स्वत:हून फोन करून डे यांना मारल्याचे कबूल केले होते.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डे यांना मारण्यामागे छोटा राजनकडे दोन कारणे होती. डे यांनी सतत छोटा राजनविरुद्ध लेख लिहून त्याला उघडे पाडले होते. त्यातच डे यांनी छोटा राजनसह २० गँगस्टरवर पुस्तक लिहीले होते. दुसरे कारण म्हणजे छोटा राजनला डे दाऊदला त्याची माहिती पुरवून त्याचा हत्या करण्याचा कट रचत असल्याचा संशय होता. या दोन्ही कारणास्तव छोटा राजनने डे यांची हत्या केली.
आरोपपत्रानुसार, डे यांच्या लेखांमुळे छोटा राजन पुन्हा एकदा उघडा पडला होता. तसेच डे यांनी ‘चिंधी - रागा टू रिचेस’ हे पुस्तक लिहीले होते. त्यांचे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर होते. मात्र त्याआधीच राजजने त्यांच्या हत्येची सुपारी दिली. या पुस्तकात डे यांनी छोट्या राजनच्या देशभक्तीचा बुरखा फाडला होता. तसेच त्याला अंडवर्ल्डच्या दुनियेत नाव कमावून देणाऱ्यांची हत्या करण्यासही राजन मागेपुढे पाहत नव्हता, याबद्दलही डे यांनी पुस्तकात लिहीले होते.
मात्र राजन पुस्तकाच्या नावावरून आणि मजकूराबाबत नाराज होता. अंडवर्ल्ड जगतात ‘चिंधी’ शब्द अगदी खालच्या पातळीच्या लोकांसाठी वापरला जातो आणि हा शब्द डे यांनी राजनसाठी वापरावा, हे राजनला आणि त्याच्या गँगला खटकत होता. याबद्दल राजनने डे यांना कॉल करून स्पष्टीकरणही मागितले. त्यावर डे यांनी त्याला त्याच्याशी कोणताही वैयक्तिक आकस नसल्याचे सांगितले. तसेच याबद्दल बोलायचे असल्यास लंडनला भेट, असेही राजनला सांगितले.
डे काही दिवसांसाठी यु. के. ला जाणार होते. मात्र तिथे ते छोटा शकीलच्या माणसाला डे भेटणार आहेत, अशी माहिती राजनच्या माणसाने राजनला दिली. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. पंरतु, डे आपली सर्व माहिती दाऊदला देत आहेत आणि आपल्या हत्येचा
कट रचला जात आहे, असा संशय छोटा राजनला आला आणि या संशयातून त्याने डे यांना मारण्याची सुपारी दिली.
आतापर्यंत सीबीआयकडे छोटा राजनविरुद्ध थेट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यांच्याकडे केवळ परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्याने केलेल्या कॉलचे सीएफएसएल अहवाल आहेत.
डे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय डे यांची पत्नी, आई, त्यांचे सहकारी आणि काही पत्रकार ज्यांना छोटा राजनने कॉल करून डे यांना मारल्याची ग्वाही दिली होती. (प्रतिनिधी)