‘जे. जे.’मध्ये अत्याधुनिक स्कॅन मशीन
By admin | Published: October 6, 2014 04:59 AM2014-10-06T04:59:34+5:302014-10-06T05:05:55+5:30
एमआरआय, सीटी स्कॅन करायला सांगितले की, काही जणांना घामच फुटतो. मात्र मुंबईकरांची चिंता आता कमी होणार आहे.
पूजा दामले, मुंबई
एमआरआय, सीटी स्कॅन करायला सांगितले की, काही जणांना घामच फुटतो. मात्र मुंबईकरांची चिंता आता कमी होणार आहे. भायखळा येथील सरकारी जे. जे. रुग्णालयामध्ये एमआरआय, सीटी स्कॅन करण्यासाठी नवीन ३ टेस्ला स्कॅन मशीन आणले आहे. येत्या १० आॅक्टोबरपासून या मशीनचा वापर सुरू होऊ शकतो. यामुळे अत्यल्प दरामध्ये चांगल्या प्रतीची तपासणी रुग्णांना करून मिळणार आहे.
मुंबईतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये १.५ टेस्ला स्कॅन मशीन वापरण्यात येते. पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञान, जास्त रेझोल्युशन असणारे हे ३ टेस्ला स्कॅन मशीन जे. जे. रुग्णालयात बसविले आहे. या मशीनचे फक्त रेझोल्युशनच चांगले नाही, तर या मशीनमुळे तपासणीसाठी लागणारा वेळदेखील कमी होणार आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
१.५ टेस्ला स्कॅन मशीनमध्ये संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्यायची असल्यास ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र ३ टेस्ला स्कॅन मशीनमध्ये संपूर्ण शरीराची तपासणी ही फक्त अर्ध्या तासात पूर्ण होईल. मशीनमध्ये आत गेल्यावर कानात येणारा आवाज, कानाला दडे बसणे, असे प्रकार घडतात. म्हणून रुग्णाला इअरफोन देऊन गाणी ऐकायला देणार आहेत. ही मशीन मोठी असल्यामुळे त्यात रुग्णाला घुसमटल्यासारखे होणार नाही. तसेच रुग्णाला या खोलीत आल्यावर भीती वाटणार नाही, अशी या खोलीची रचना केल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)