पावसात रंगला भक्तीचा मेळा.. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणीकाळभोरमध्ये विसावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:29 PM2019-06-28T17:29:54+5:302019-06-28T17:47:44+5:30
पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला
- तेजस टवलारकार-
पुणे - भागवत सांप्रदायाची पताका फडकावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करत पंढरीस निघालेल्या श्री संत तुकोबाराय यांची पालखी लाखो वैष्णवांसोबत मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पुण्याहुन लोणीकाळभोरमध्ये पोहचली. पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला .ढगाळ वातावरणात पालखी सोहळ्याची हडपसरच्या दिशेने वाटचाल सुरू झाली .रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठीं गर्दी पालखीचे दर्शन घेण्यासाठी होती. सर्वत्र जय हरी माऊलीचा नामघोष सुरु होता. या नामसंकीर्तन, अभंगात पालखीची वाटचाल सुरू होती.
पुण्यातून भक्तिभावयुक्त निरोप घेऊन तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यावर तिचा पहिला विसावा हा हडपसर गाडीतळ येथे झाला.पालखी स्थळावर परिसरातील भाविक दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते .
दिड्यांमधून दुमदुमणारा टाळ विणेच्या झंकारात हरिनामाच्या जयघोषाने आनंदाला आसमंत निनादून गेला. सर्वत्र भक्तीचा रंग चढत होता .ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी भव्य रांगोळ्या, फुलांची सजावट आकर्षक कमानी उभारण्यात आली होती. वारकरी अभंगाच्या तालावर नाचत गात होते. पालखीच्या दिंडीतील हा क्षण मनात घर करून राहणार होता. वारकसोबत मोठ्या प्रमाणात नागरिक वारीत सहभागी झाले होते. पालखी हडपसरला आगमन करताच पाऊस सुरू झाला पावसातही भाविक पालखीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते व माऊली तुकारामांचा गजर करत आनंद घेत होते. यावेळी महापौर मुक्त टिळक उपस्थित होत्या. हडपसर पोलिसांच्या वतीने तुकाराम महाराजाचे तेरावे वंशज संतोष मोरे महाराज यांचा सत्कार करण्यात आला
पालखी विश्रांतीसाठी हडपसर ला पोहोचली भाविक जेवणाची व फराळाचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा करत होते. भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी मोठी होती. भाविक व वारकऱ्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. त्यानंतर दुसरा विसवाची वेळ झाली. मांजरी फार्म येथे दुपारचा विसावा झाला. विसाव्यात वारकरी अभंग ,भारुड गात फुगड्या खेळत होते व भक्तीचा आनंद घेत होते. त्यानंतर लोणीच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचे स्वागत केले.