जागर सामाजिक बांधिलकीचा
By Admin | Published: October 8, 2016 01:13 AM2016-10-08T01:13:48+5:302016-10-08T01:13:48+5:30
गेल्या ३२ वर्षांपासून भांडुपचे नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ नवरात्रौत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे.
मुंबई : गेल्या ३२ वर्षांपासून भांडुपचे नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ नवरात्रौत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे. नवरात्रीच्या काळात या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते.
भांडुप पश्चिमेकडील नरदासनगर परिसरात देवीची आकर्षक मूर्ती बसविण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांनी एकत्रित येत उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही छोटेखानी उत्सवाची सुरुवात केली. मात्र हळूहळू यात भर पडत भाविकांची रीघ वाढत गेली. याच ठिकाणी विविध स्पर्धात्मक खेळांपासून महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
येथील रात्रीचा ‘फॅन्सी गरबा’ही तितकाच प्रसिद्ध आहे. यामध्ये ९ रंगांची सांगड घालत महिला सहभाग घेतात. (प्रतिनिधी)
>सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नऊ दिवस विविध रंगांच्या साड्यांमध्ये महिला एकरूप झालेल्या पाहावयास मिळतात. तसेच यामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही या ठिकाणी पाहावयास मिळते. रविवारी सत्यनारायणाच्या महापूजेचे आणि महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्रौत्सवादरम्यान या मंडळातर्फे वैद्यकीय शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अवयवदानावर विशेष भर
उत्सवानिमित्त या मंडळाकडून अवयवदानाविषयी विशेष जनजागृती केली जाते. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशात जर आपण अवयवदान केल्यास एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत होईल. त्यामुळे अवयवदान करणे महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.