जगदाळे, सुधाकर चव्हाण यांनाही पोलीस कोठडी

By admin | Published: December 7, 2015 01:57 AM2015-12-07T01:57:42+5:302015-12-07T01:57:42+5:30

ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि मनसेचे माजी गटनेते सुधाकर चव्हाण यांची प्रकृती उत्तम असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने

Jagdale, Sudhakar Chavan also got the police custody | जगदाळे, सुधाकर चव्हाण यांनाही पोलीस कोठडी

जगदाळे, सुधाकर चव्हाण यांनाही पोलीस कोठडी

Next

ठाणे : ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि मनसेचे माजी गटनेते सुधाकर चव्हाण यांची प्रकृती उत्तम असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने, रविवारी ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी त्यांची नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल शनिवारी हे दोघे पोलिसांना शरण आले होते. मात्र, प्रकृतीचे कारण देत, त्यांनी कोठडी टाळली होती.
परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघांची चौकशी करायची असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर, न्यायालयाने जगदाळे व चव्हाण यांना १४ डिसेंबरपर्यंत कोठडी दिली.
शनिवारी चव्हाण आणि जगदाळे यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी दरम्यान केली. त्यामुळे त्यांची मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर, रात्री १२.३० पर्यंत त्यांना ठाण्यात आणण्यात आले. रविवारी सकाळी ८ वाजता पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वैद्यकीय कारणास्तव कमीत कमी कोठडी देण्यासाठी आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यावर गेल्या दहा दिवसांमध्ये पोलीस ठाण्यातील हजेरीमध्ये या सर्वांची प्रकृती ठणठणीत होती.
तसेच जे. जे. रुग्णालयाने दिलेल्या अहवालाच्या आधारे त्यांची प्रकृती चांगली असल्याचा दावा पोलिसांनी केला. दोन तास चाललेल्या युक्तिवादानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी जगदाळे आणि चव्हाण या दोघांनाही पोलिसांच्या मागणीप्रमाणे १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. (प्रतिनिधी)
जगदाळे आणि चव्हाण या दोघांनीही परमार यांच्याकडून पैसे घेतले नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला, तेव्हा पोलिसांनी परमार यांची ‘ती’ लाल डायरी सादर करून, त्यांच्यापैकी एकाच्या नावापुढे किती रक्कम लिहिली, ते अधोरेखित करून दाखविले. हे चौघेही पालिकेत ‘गोल्डन गँग’ म्हणून ओळखले जातात, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. आर्किटेक्टला हाताशी धरून कोणत्याही बांधकामातील अनियमितता शोधून काढून, नंतर त्या व्यावसायिकाविरुद्ध महापालिकेच्या स्थायी सभेत, तसेच महासभेत बांधकामांसंदर्भात आक्षेप घेण्याची धमकी या चौघांकडून दिली जात होती, असे पोलिसांनी सांगितले. एखाद्या बिल्डरने ऐकले नाही, तर त्याविरुद्ध महापालिकेत ‘आवाज’ उठविला जात होता. शहरातील इतर अनियमिततेपेक्षा परमार यांच्यावर या नगरसेवकांनी सर्वाधिक आरोप केले होते. परमार यांच्या कॉसमॉस ग्रुपमधील अनियमितता शोधण्यासाठी या चौघांनी त्यांचा पिच्छा पुरवल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉसमॉसच्या अनियमिततेवर बोट ठेवणाऱ्या जगदाळेंनी स्वत:च्या उभ्या केलेल्या इमारतींमध्येही अनेक अनियमितता आहेत, याकडे लक्ष वेधत, पोलिसांनी त्याविरोधात त्यांनी का आवाज उठविला नाही़? असा सवाल केला.
पुरावे ‘क्रीएट’ करण्यासाठी कोठडी नव्हे...
पुरावे ‘क्रीएट’ करण्यासाठी आरोपींची कोठडी मागितली जात असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला. तेव्हा पुरावे ‘क्रीएट’ करण्यासाठी नव्हे, तर आहे ते गोळा करण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे, एसीपी दिलीप गोरे म्हणाले.
तपास अधिकाऱ्यांनी मांडली बाजू
विशेष सरकारी वकील राजा ठाकरे हे रविवारी या सुनावणीच्या वेळी उपस्थित नव्हते. तेव्हा पोलिसांची बाजू तपास अधिकारी दिलीप गोरे यांनीच न्यायालयासमोर मांडली, तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. गजानन चव्हाण आणि अ‍ॅड. सावंत यांनी बाजू मांडली.

Web Title: Jagdale, Sudhakar Chavan also got the police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.