“...तर ‘मातोश्री’ला घेराव घालणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:17 AM2021-07-18T10:17:47+5:302021-07-18T10:19:18+5:30
नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून थांबविले पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण :नवी मुंबईविमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून थांबविले पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. ‘मातोश्री’ला घेराव घालण्यात येईल. त्याचबरोबर पंतप्रधानांकडे दिल्ली येथे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले जाईल, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला आहे.
दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती, कल्याण-डोंबिवलीतर्फे शनिवारी डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये विमानतळ नामकरण परिषद झाली. यावेळी लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते अर्जुनबुवा चौधरी, कॉम्रेड कृष्णा भोयर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या १९ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नातेवाइकांची नावे विकासप्रकल्पांना दिलेली नाहीत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनीदेखील दि. बा. यांच्या नावाला विरोध केला नसता. दि. बा. यांच्या नावासाठी आगरी समाजाचे केंद्रात प्रथमच मंत्री झालेले कपिल पाटील आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे आग्रही आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. समाज निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
काँग्रेसचे केणे म्हणाले, केंद्रीय उड्डाणमंत्री यांना भेटून आमची या विषयाची मागणी त्यांच्यासमोर ठेवणार आहोत. यापूर्वी २०१८ मध्येही या मागणीसाठी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.